उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) महानगरपालिका हद्दीत कॅम्प नंबर चार येथे सुभाष टेकडी परिसरातून बांद्रे कुर्ला कॅम्पकडे एक रस्ता जातो. हा रस्त्यावर साधारण एक फूट खोल तर बारा ते पंधरा फुटाचा मोठा खड्डा पडलाय. या खड्ड्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र होतं. शेवटी या त्रासाला कंटाळून एका रिक्षाचालकाने स्वखर्चातून स्वत:च्या रिक्षामधून खडी आणली आणि खड्डे बुजवले. या रिक्षाचालकाचा खड्डे बुजवताना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.


मात्र रिक्षाचालकाला खड्डे बुजवण्याची गरज का पडली हा मुद्दा सध्या उपस्थित केला जात आहे. तर याचं उत्तर देखील याच रिक्षाचालकाने दिलं आहे. या रिक्षाचालकाला या खड्ड्यांमुळे अनेक त्रास होऊ लागले. तसेच त्याची रिक्षा देखील वारंवार खराब होत होती. त्यामुळे संसप्त झालेल्या रिक्षाचालकाने  स्वतःच्या रिक्षात खडी आणि रेती भरुन आणली आणि तो खड्डा बुजवला. दरम्यान अशोक सैदाने असं या रिक्षाचालकाचं नावं आहे. 


...त्यानंतर महानगरपालिकेला जाग आली?


दरम्यान या रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेला थोडीफार लाज वाटली असावी असं म्हटलं जात आहेत. त्यानंतर महानगरपालिकेकडून दुसऱ्याच दिवशी अगदी नावापुरता का होईला तो खड्डा भरण्यात आला. त्या खड्ड्यामध्ये माती आणि दगड टाकून महानगरपालिकेकडून रस्ता दुरुस्त करण्यात आला. यामुळे या भागातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया


महानगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. तर महानगरपालिकेकडून हा खड्डा बुजवल्यानंतर नागरिकांकडून संसप्त प्रतिक्रिया देखील आली आहे. आम्ही माणसं आहोत, जनावरं नाही अशा खोचक शब्दात नागरिकांनी त्यांचा रोष व्यक्त केलाय. 


तसेच आगामी काळात तरी महानगरपालिका हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त करेल असा आशावाद देखील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान या रस्त्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्या देखील उद्भवल्या आहेत. अशातच जर महानगरपालिका अशाच प्रकारे दुर्लक्ष करत राहिली तर काहीतरी मोठा अपघात होऊ शकतो, असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. 


मुंबईतील खड्डे आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास ही गोष्ट काही नवीन नाही. पण आता यावर नागरिकांनीच तोडगा काढल्याचं या घटनेमुळे निदर्शनास आलं आहे. तर यावर प्रशासन आता तरी गांभीर्याने विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


ऐकावं ते नवलंच! बँकेनं चुकून कॅब ड्रायव्हरच्या खात्यात टाकले तब्बल 9000 कोटी, वाचा पुढं काय झालं...