ठाणे : ठाणे (Thane)  जिल्ह्याचं पुन्हा विभाजन करत कल्याण जिल्हा वेगळा करा अशी मागणी भाजप आमदार किसन कथोरे (Kisan Kathore)  यांनी केली. सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यात पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)  यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात त्यांनी ही मागणी लावून धरली. मात्र अशा पद्धतीने बैठकीत तसा ठराव करता येणार नाही असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पालघर (Palghar) जिल्हा वेगळा झाला तेव्हाच कल्याण (Kalyan)  जिल्ह्यासाठीही मागणी करण्यात येत होती. मात्र तेव्हा या मागणीला फारसं यश आलं नाही. आता पुन्हा या मागणीने जोर धरला आहे. 


ठाणे जिल्ह्याचं पुन्हा विभाजन करण्यासंदर्भात  सर्व पक्षीयांशी चर्चा करुन वरीष्ठांशी चर्चा करुन त्यानुसार पुढील निर्णय घ्यायचा की नाही? हे निश्चित करता येईल असे स्पष्ट केले. ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असतांना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावा अशी मागणी लावून धरण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. कल्याण ते थेट कर्जत पर्यंत हा जिल्हा असावा असेही यात नमुद करण्यात आले आहे. कर्जत मधील नागरीकांना आपल्या विविध गोष्टींसाठी किंवा शासकीय कामांसाठी अलिबागला जावे लागत आहे. त्यामुळे तो फार लांबचा फेरा पडत आहे. त्यामुळे कल्याण जिल्हा झाल्यास रेल्वेची सुविधा असल्याने येथील नागरीकांना देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्या अनुषगांने ही मागणी करण्यात आली होती.


मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करणार : शंभुराज देसाई


मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही मागणी लगेच पूर्ण होणार नाही, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो असे सांगितले.  शंभुराज देसाई म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर कथोरे यांच्या मागणीवर कोणता निर्णय घ्यायचा तो योग्यवेळी घेण्यात येईल. 


निवडणुका जवळ आल्यानंतर जिल्हा विभाजनाचे पडघम 


लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या की जिल्हा विभाजनाचे पडघम वाजू लागतात. ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा करताना देखील बराच खल झाला होता. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके आहेत.  कल्याण तालुक्याला जोडलेले असून कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे.


भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची सरकारची योजना


राज्यात 2014 पासून नवीन जिल्हा तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना राज्य सरकरची आहे. सध्या पालघरचे विभाजन करून जव्हार, ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे  या मागणीने जोर धरला आहे. 


हे ही वाचा :


कर नाही त्याला डर कशाला? दूध का दूध पानी का पानी होईल, मुख्यमंत्र्यांचा रविंद्र वायकरांवर हल्लाबोल