Case Filed Against Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये (Nashik Political News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित शाहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या (Nashik News) पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्या प्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. 


दरम्यान, शिसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्याच राजकारणाला कलाटणी मिळाली. सध्या संपूर्ण राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (रविवारी) पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत जहरी टिका केली होती. यालाच प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले.