ठाणे:  ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश अहीर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली होती. या हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक झाली. मात्र आरोपी नंबर एक असलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अटक केलेली नसून आज कारवाई होण्याची शक्यता आहे. तर आव्हाडदेखील आज अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणार आहेत.  दरम्यान आज चारही आरोपींना पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे.


जितेंद्र आव्हाडांपासून माझ्या कुटुंबाला धोका असल्याचा दावा महेश आहेर यांनी केला आहे. तर जीवे मारण्याचा कट असल्याचा आव्हाडांनी आहेर यांच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे आव्हाड अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहेत.  


बुधवारी (15 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केल्याची घटना घडली. महेश आहेर यांना तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव आहेत.


ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदूक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याचठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.


ऑडिओ क्लिप व्हायरल  


जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली आहे. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी, पैसे मोजणारा व्यक्ती त्यांचा जमा-खर्च सांभाळणारा; जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला व्हिडीओ