मुंबई : खासदार नरशे म्हस्के यांच्यासह ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवलेल्या 22 उमेदवारांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. नरेश म्हस्केंची (Naresh Mhaske) खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन विचारेंनी (Rajan Vichare) हायकोर्टात धाव घेतली आहे. त्या प्रकरणात हायकोर्टाने ही नोटीस बजावली आहे.
नरेश म्हस्के एका प्रकरणात दोषी असतानाही त्यांनी निवडणूक लढवल्याबाबत राजन विचारे यांनी आक्षेप नोंदवला. नरेश म्हस्केंच्या प्रतिज्ञापत्रात मात्र त्यांनी दोषी नसल्याचा खोटा उल्लेख केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची ही दिशाभूल असल्याचा आरोपही राजन विचारे यांनी केला. याप्रकरणी न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली असून या याचिकेवर 2 सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी ठाकरेंचे उमेदवार राजन विचारे यांचा दोन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. ठाण्याच्या या निवडणुकीकडे सर्वाचंच लक्ष लागलं होतं. ठाणे एकनाथ शिंदे याचा बालेकिल्ला समजला जातो. पण या आधी त्या ठिकाणी खासदार असलेले राजन विचारे हे ठाकरे गटासोबत गेले. त्यामुळे ठाण्याच्या जागेवर एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात असल्याचा मस्केंचा दावा
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश मस्केंनी केला होता. ते म्हणाले होते की, "ठाकरे गटाच्या या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ."
ही बातमी वाचा :