Neral Matheran Toy Train : माथेरानची राणी (Matheranchi Rani) सुरु होऊन एक आठवडा होत नाही, तोवरच तिला रोखण्यासाठी अज्ञाताकडून प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मिनी ट्रेनच्या रुळावर कोणीतरी ट्रॅकचा तुकडा आडवा टाकून या ट्रेनच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी नेरळ-माथेरान मार्गावर 2 मीटर लांबीच्या जुन्या रेल्वे तुकड्यासह काही लोखंडी तुकडे मोटरमनने पाहिले. चालकाने तातडीने ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला. अज्ञाताच्या या कृत्यामुळे ट्रेन रुळावरुन घसरण्याची शक्यता होती, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं.


गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली माथेरानची राणी मागच्या आठवड्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा एकदा धावली. ही मिनी ट्रेन सुरु झाली म्हणून पर्यटक तसेच स्थानिक हे अतिशय आनंदी झाले, एक आठवड्यात या मिनी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेला तब्बल पाच लाख रुपयांचा आर्थिक फायदा सुद्धा झाला. मात्र ही मिनी ट्रेन सुरु होऊन एक आठवडा होत नाही, तोपर्यंत तिला रोखण्यासाठी अज्ञातांनी प्रयत्न केला.


दोन ठिकाणी रुळावर तुकडे आढळले
नेरळपासून (Neral) निघालेली मिनी ट्रेन अर्धा रास्ता कापून माथेरानजवळ (Matheran) येताच अमन लॉज आणि वॉटर पाईप रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रुळावर लोखंडी तुकडा मोटरमनला दिसला. एवढंच नव्हे तर हा ट्रॅकचा तुकडा एक ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी ठेवण्यात आल्याचा मोटरमन दिनेश चंद मीना यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर मोटरमनने मिनी ट्रेन थांबवून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रॅकचा तुकडा रुळावरुन बाजूला केला आणि मग गाडी घेऊन पुढे निघाले. मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे मोठ अपघात टळला.


अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जर हा ट्रॅकचा तुकडा मोटरमनच्या निदर्शनास आला नसता तर मोठी दुर्घटना झाली असती आणि या दुर्घटनेत निष्पाप पर्यटकांचा जीव गेला असता. मात्र इतका मोठा घातपात करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल आणि हा जर घातपात नसेल तर एवढी भयंकर हुल्लडबाजी किंवा मस्ती कोणी केली असेल हा तर रेल्वे पोलिसांचा शोधाचा विषय आहे. पर्यटक हे माथेरानला निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी येतात आणि जर या पर्यटकांसोबत अस घातपात करण्याचा प्रयत्न होत असेल तर हा खूपच गंभीर विषय आहे. या प्रकरणी नेरळ जीआरपीने अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.