Kalyan : कल्याण खाडी येथे मराठा आरमाराचे स्मारक म्हणून भारतीय नौदलाची युद्धनौका T-80 विराजमान करण्यासंदर्भातभारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी काल सामंजस्य करार केला. T-80 स्मारक हे स्मार्ट सिटीच्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पातील नेव्हल गॅलरी कॅम्पसचा भाग आहे.सामंजस्य करारामुळे भारतीय नौदलाचा कल्याण-डोंबिवलीच्या ऐतिहासिक वारशाच्या इतिहासाशी संबंध कायमचा जोडला जाणार असून  कल्याण डोंबिवली शहराला पर्यटनासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.


या सामंजस्य कराराच्या वेळी भारतीय नौदलाचे मुख्यालय महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे अधिकारी कमोडोर जिलेट कोशी, कमांडर अभिषेक कारभारी, कॅप्टन पी के मन्ना, लेफ्टनंट अरुण कुमार, लेफ्टनंट सोम प्रकाश आणि लेफ्टनंट अर्जुन पंडित यांनी प्रतिनिधित्व केले. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, हेरीटेज सल्लागार सचिन सावंत आदी उपस्थित हाेते.


छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या मराठा आरमाराची उभारणी केलेल्या कल्याणच्या दुर्गाडी बंदरात पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी होत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी इतिहासाला अभिवादन करण्यासाठी कल्याणच्या उल्हास नदीकिनारी नेव्हल गॅलरीच्या रूपात असा हेरिटेज कॅम्पस उभारण्याची कल्पना कल्याणचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंश यांची कल्पना हाेती. त्यांच्या पश्चात ही कल्पना साकरण्यासाठी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे हे काम करीत आहेत.


नेव्हल गॅलरीत काय असेल...
लवकरच प्रेक्षकांसाठी निर्माण होणारी नेव्हल गॅलरी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचा समृद्ध सागरी इतिहास दर्शवेल.  कायमस्वरूपी सार्वजनिक प्रदर्शनात मराठ्यांच्या तसेच भारतीय नौदलाच्या अनेक प्रेरणादायी घटना चित्रे, शिल्पे, कलाकृती आणि मल्टिमिडीयाच्या रूपात मांडले जातील.  नियोजनाच्या टप्प्यापासूनच हा प्रकल्प भारतीय नौदलातील अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागासह विकसित केला गेला आहे.  भारतीय नौदल आणि SKDCL यांच्यातील सहकार्यामध्ये विविध कमांड्सला अभ्यास दौरे, अभिलेखीय ऐतिहासिक सामग्रीची देवाणघेवाण आणि आता खुद्द T-80 युद्धनौकेचे कायमस्वरूपी प्रदर्शन यांचा समावेश आहे.


टी-80 ची पाश्वभूमी...
इंडियन नेव्हल फास्ट अटॅक क्राफ्ट  T-80 ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सन्मानाने मुंबई येथे सेवानिवृत्त झाली. इस्त्राईल येथे मेसर्स आयएआय रामता यांनी बांधलेली ही युद्धनौका २४ जून १९९८ रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित झाली होती. हे जहाज विशेषतः उथळ पाण्याच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आले होते आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्यात ही युद्धनौका कायम तत्पर राहिली.