Thackeray Banner : महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्य परिस्थितीनंतर राज ठाकरे (Raj Thackarey) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांच्या एकजूटीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. या राजकारणावर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे अशी मागणी सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. वारंवार पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे. सध्या या आशयाचे बॅनर कल्याण परिसरात झळकताना पहायला मिळत आहेत.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी कल्याण मध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांकडून आवाहन करत केडीएमसी मुख्यालयासमोर बॅनर लावण्यात आले आहेत. 


 'महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या....हीच ती योग्य वेळ, महाराष्ट्राला राजकारण नको ,तर महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही एकत्र या, महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा' असा मजकूर या बॅनरवर आहे. तसेच या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे ,उद्धव ठाकरे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. मनसेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी हे बॅनर लावले आहेत. अजित पवारांनी सत्तेमध्ये सहभाग घेतल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 


शिवसेना भवन परिसरात झळकले होते बॅनर


महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसेकडून शिवसेना भवन आणि दादर परिसरात देखील बॅनर लावण्यात आले होते.मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साद घालणारे बॅनर लावले होते. या बॅनरवर देखील बाळासाहेब, उद्धव आणि राज यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला होता. तसेच सोशल मिडियावर देखील यासंदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. 


'मनसेचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी फेटाळला होता'


मनसेकडून दोनदा उद्धव ठाकरे यांना दोनदा प्रस्ताव दिल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना म्हटलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी दोनदा तो प्रस्ताव फेटळला असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. 2014 आणि 2017 या दोन्ही वर्षी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता. पण ठाकरेंकडून टाळाटाळ करण्यात आली, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. 


दरम्यान लोकसभा निवडणुकींमध्ये उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर देखील मनसे नेत्यांच्या बैठकीत उमटला आहे. त्यामुळे आता तरी ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 


हे ही वाचा :