कल्याण: नियती किती निष्ठूर असू शकते, याचा प्रत्यय नुकताच कल्याणमधील (Kalyan) खडकपाडा परिसरात आला. येथील एका उच्चभ्रू वस्तीमधील गृहसंकुलात एका महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. यावेळी तिचा गतिमंद मुलगा तिच्यासोबत होता. मात्र, आपल्या आईने जीव सोडल्याचे या गतिमंद मुलाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे तो चार दिवस आईच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. अखेर शेजाऱ्यांना मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. 


सिल्व्हिया डॅनिअल (वय 44) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या आपला नवरा आणि गतिमंद मुलासह खडकपाडा परिसरातील सुंदर या इमारतीमध्ये राहत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांचे पती डॅनिअल कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचा 14 वर्षांचा गतिमंद मुलगा ऑल्विन डॅनिअल त्यांच्यासोबत घरात होता. मात्र, सिल्व्हिया यांचा झोपेत असताना मृत्यू झाला. ही गोष्ट ऑल्विनला समजली नाही. तो तब्बल चार दिवस सिल्व्हिया डॅनिअल यांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. अखेर डॅनिअल यांच्या शेजाऱ्यांना बुधवारी प्रचंड दुर्गंध येऊ लागला. ही दुर्गंधी कुठून येते आहे, याचा शोध शेजाऱ्यांनी सुरु केला. तेव्हा सिल्व्हिया डॅनिअल यांच्या घरातून वास येत असल्याचे लक्षात आले. इमारतीचा वॉचमन आणि शेजाऱ्यांनी सिल्व्हिया डॅनिअल यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. दरवाजा उघडल्यानंतर आणखीनच दुर्गंध येऊ लागला. शेजाऱ्यांनी डॅनिअल यांच्या घरात प्रवेश करताच सिल्व्हिया यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाच्याशेजारी ऑल्विन तसाच बसून होता. पोलिसांनी ऑल्विनला या सगळ्या प्रकाराबाबत विचारल्यानंतर त्याने आई खूप आजारी असल्याचे सांगितले. हा सगळा प्रकार ऐकून पोलिसांसह शेजाऱ्यांचे मन हेलावून गेले. या घटनेबद्दल खडकपाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


सिल्व्हिया डॅनिअल यांचे पती पुण्यात नोकरीला आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. सिल्व्हिया यांचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मिणीबाई  रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सिल्व्हिया यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.


इतर बातम्या


यशश्रीने टॅटू स्वत:च्या मर्जीने काढला की दाऊदच्या जबरदस्तीने?; आता टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर


यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत मोठी अपडेट, पोलिसांना सापडण्याआधीच दाऊद शेखने महत्त्वाचा पुरावा नष्ट केला?