ठाणे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) अनेक सभांना उशीर झाल्याने पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, यावरूनच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातून सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्ही शांत राहूनही आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे, सरकारला राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवायची नाही का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आम्ही कायदा सुव्यवस्था कायम राखत असताना देखील आमच्यावर गुन्हे का दाखल केले जात आहे? असाही सवाल जरांगे यांनी केला आहे.


दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "शांत राहा म्हणून आम्ही समाजाला सांगत आहे. मात्र, दुसरीकडे तुम्ही आमच्यावर गुन्हे ठोकत आहे. सगळीकडे असेच गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे, सरकारला हा आमचा प्रश्न आहे की, तुम्हीच यांना पुढे करत आहेत का?, माझा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे. तसेच, सरकारलाच दंगली भडकावून आणायच्या आहेत का? असाही सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 


सरकारलाच दंगली घडून आणायचे आहेत का? 


शांत रहा म्हणून मराठ्यांना आपण रात्रंदिवस आवाहन करत आहोत. यात काय वाईट काम करत आहोत. शासन आणि प्रशासनाचे हे काम आहे, पण आम्ही रात्र-दिवस जागून राज्यातील कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून प्रयत्न करत आहोत. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस देखील रात्रंदिवस जागतात. शांतता राहावी म्हणून आम्ही देखील दिवस रात्र जागत आहोत. मात्र, असे असताना आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. कल्याणमध्ये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लामपूर, सांगली, धाराशिव या ठिकाणी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सरकारलाच कायदा सुव्यवस्था बिघडायची आहे असं मराठ्यांनी समजायचं का?, हा माझा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे. ओबीसी आणि मराठा बांधवात वाद होऊ नये, शांतता राहावी यासाठी आम्ही रात्र-दिवस प्रयत्न करतोय. दिवस पुरत नसल्याने रात्री लोकांच्या दारात जाऊ लागलो. याचा अर्थ तुम्हीच त्यांना (छगन भुजबळ आणि टीका करणाऱ्या ओबीसी नेते) पाठबळ देत आहात. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून सरकारलाच दंगली घडून आणायचे आहेत का? असा याचा अर्थ आहे का? असे जरांगे म्हणाले.


...तर गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार 


शांततेचं राज्याला आवाहन करून आम्ही काय चुकीचं केलं. पण ते लोकांमध्ये रोष पसरू लागले आहेत. दंगलीची भाषा करायला लागले. आम्ही लोकांना सांगतोय शांत रहा, आपण दोघे लहान मोठे भाऊ आहेत. आजही आपण एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जात आहे. राजकीय स्वार्थापोटी राज्यात दंगली होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय. पण जे आमचे कार्यक्रम घेतायात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करायला लागला. तुम्ही गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार आहोत का?, याचे उत्तर आत्ताच नाही हेच आहे. राज्यात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असल्याने आमच्यावर गुन्हे दाखल करत असाल तर तुम्ही आणखी गुन्हे दाखल करा. असे गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. असे गुन्हे दाखल केल्याने राज्यातील मराठा समाज घाबरणार नाही आणि खचणार देखील नाही, असेही जरांगे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या उशीरापर्यंत सभा, धाराशिव, साताऱ्यात पोलिसांची कारवाई; आयोजकांवर गुन्हे दाखल