Aarey Mumbai Metro Car Shed : मुंबई मेट्रो कारशेडचं आरे जंगलात सुरु असलेलं काम थांबवावे यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


राज्यातील सत्तेतून महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आरेतील मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यावरील बंदी हटवली. महाविकास आघाडीच्या सरकारने आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. आरेऐवजी कांजूर येथे कारशेड उभारण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. 


ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची  निवड करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात  महाविकास आघाडीचे सरकार आले.  त्यावेळी  एकनाथजी शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले  होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करताबरोबरच आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या निर्णयानंतर राज्यातील पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली असल्याचे काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख समीर वर्तक यांनी सांगितले. शिंदे सरकारचे घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्यावतीने आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती वर्तक यांनी दिली. 


आरेत आज आंदोलन


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती देत कांजूर येथील जागेसह इतर पर्यायांवर विचार सुरू केला. कांजूर येथील जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. मागील महिन्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या नव्या सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मागील काही रविवारपासून मुंबईकर आणि पर्यावरण प्रेमींकडून या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. आजही 'आरे वाचवा' मोहिमेतंर्गत आरेत मेट्रो कारशेड विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. 


एक लाख कोटींच्या डीलसाठी आरेचा बळी; पर्यावरणवाद्यांचा आरोप


आरेतील मेट्रो-3 चे कारशेड उभारून येथील जमिनीचा व्यावसायिक वापर आणि कांजूरमार्ग येथील पर्यायी जागाही विकासकांना देण्याचा डाव असून  या दोन्ही जागांसाठी सुमारे एक लाख कोटींची डील असल्याचा गंभीर आरोप आरोप 'आरे कन्झर्वेशन ग्रुप'ने (Aarey Conservation Group) एका पत्रकार परिषदेत केला होता. कांजूरमार्ग येथील जागा ही मेट्रो-3सह, मेट्रो 4, मेट्रो 6 आणि मेट्रो 14 साठीदेखील फायदेशीर ठरणार असल्याचे दावा आरे बचाव कार्यकर्त्यांनी केला. कांजूरमार्ग येथील जागा ही महाराष्ट्राचीच असताना राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा खासगी मालकीची असल्याचे सांगत दिशाभूल करत असल्याचा आरोपही 'आरे बचाव'च्यावतीने करण्यात आला.