ठाणे: कल्याणमध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे  (Shrikant Shinde) आणि मनसेचे आमदार राजू पाटील  (Raju Patil) यांच्या वादाने टोकाचं वळण घेतलं असताना श्रीकांत शिंदेंनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.


कल्याण ग्रामीणमध्ये मनसे-शिवसेना वाद हा नेहमीच पाहायला मिळतोय. त्यातून शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा कलगीतुरा रंगताना दिसतोय. त्याच पार्श्वभूमीवर आता श्रीकांत शिंदे यांची राजकीय चाल यशस्वी ठरली असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिवसेनेने दसऱ्याच्या आधीच मनसेची लूट केल्याची चर्चा आहे. 


श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांचा वाद 


काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये रील आणि ट्विटर वॉर चांगलंच रंगलं होतं. त्याची राज्यभर चर्चा झाली होती. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रील आणि ट्विटरवर एकमेकांचे उणे दुणे काढले होते. ही चर्चा कुठे शांत होत नाही तोच शिवसेनेने मनसेचे कार्यकर्तेच फोडले आहेत. त्यामुळे येत्या काळात हा वाद नव्याने वाढण्याची शक्यता आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार राजू पाटील यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये विकास कामांचा धडाका लावला, या विकास कामांना प्रेरित होऊन शेकडो मनसे पदाधिकऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. 


शिवसेना कार्यकर्ते सुहास तेलंग म्हणाले की, सोशल मीडियावर आणि ट्विटरवर विकास कामं होत नसून ती कामं प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला उतरून केली पाहिजेत. मात्र असं होत नसल्यामुळे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.


दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला राजू पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 


ही बातमी वाचा: