ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकात एक अज्ञात व्यक्ती ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला होता. त्यामुळे, रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ उडाला, तो जवळपास दोन तास त्या खांबावरच इकडून तिकडे करत होता. या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकाच्या एक आणि दोन फलाटावर रेल्वेसेवा (Railway) विसकळीत झाली होती. अखेर कंरट लागल्याने तो खाली पडून गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर, रेल्वेतील सुरक्षा रक्षकांनी संबंधित व्यक्तीला मुंबईतील (Mumbai) सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन मधील ओव्हरहेड वायरच्या खांबावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारासएक अज्ञात व्यक्ती चढला. रेल्वे आरपीएफ जवान आणि जीआरपी पोलिसांनी त्याला खाली येण्यासाठी विनवणी केली, ते त्याची समजूत काढत होते. मात्र, त्याने एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटाच्या दिशेने खांबावर चालण्यास सुरुवात केली. त्याला करंट लागू नये यासाठी काही वेळेकरीता रेल्वे स्थानकातील वीज पुरवठा देखील खंडीत केला गेला होता. फलाट क्रमांक एक अ , एक, दोन , तीन आणि चार या पाच फलाटावरील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होती. लोकल गाड्या थांबल्या होत्या. रेल्वे स्थानक प्रवाशांनी तुडुंब भरले होते. दुपारचे 2 वाजून 42 मिनिटांनी आरपीएफने त्याला खाली उतरविण्याकरीता अग्नीशमन दलाला पाचारण केले. पाच मिनिटात अग्नीशमन दलाचे जवान त्याठिकाणी दाखल झाले, त्यांनीही संबंधितास खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर देखील तो व्यक्ती खाली आला नाही. त्याला खाली उतरविता आले नाही. मात्र, वीज पुरठवा सुरू झाल्याने अचानक त्याला करंट लागला आणि तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
दरम्यान, हा व्यक्ती अधून-मधून खाली येण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने एकाकडून मोबाईल मागितला होता. त्याला पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून मोबाईल पण दिला गेला. त्यानंतर काही वेळेने त्याने तो मोबाईल पुन्हा परत दिला. सध्या या व्यक्तीवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो कोण आहे त्याने हे कृत्य का केले ? याचा तपास पोलिस आणि आरपीएफकडून सुरु आहे. मात्र, जवळपास दोन तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, असे अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी सांगितले.
