ठाणे : 'देव तारी त्याला कोण मारी' या मराठी म्हणीची प्रचिती कल्याणमध्ये आली आहे. एका हायप्रोफाईल सोसायटीत राहणारी 72 वर्षीय वृद्ध महिला घरातील निर्माल्य टाकण्यासाठी नदीवर गेली. मात्र त्या ठिकाणी निर्माल्य टाकत असताना तिचा तोल जाऊन ती नदीपात्रात पडली आणि वाहून जावू लागली. त्याचवेळी काही आतंरावर ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलीस आणि वार्डनने जीवाची बाजी लावत  आपल्या  ट्रॅफिक  वार्डनसोबत  नदीत  उडी  मारून  त्या  महिलेचे  प्राण  वाचवले.


ही घटना कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलानजीक घडली आहे. मच्छिंद्र चव्हाण असे वाहतूक पोलीस कर्मचारी आणि संजय जयस्वाल असे देवदूत  ठरलेल्या  ट्रॅफिक  वार्डनचं  नाव  आहे. तर  सुनंदा  बोरसे (वय 72) असे प्राण वाचवलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे. 


पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि वार्डन जयस्वाल गेल्या 6 महिण्यापासून कल्याण वाहतूक शाखेच्या हद्दीत असलेल्या गांधारी पुलानजीक वाहतूक कोंडी व वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहेत. कल्याण पश्चिम भागातील  गांधारी येथील रोनक  सोसायटीमध्ये सुनंदा बोरसे या 72 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह राहतात. सुनंदा बोरसे या महिला निर्माल्य टाकण्यासाठी रविवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास  नदीजवळ आल्या होत्या. 


दुसरीकडे दोन दिवसापासून   कोसळणाऱ्या पावसामुळे नदीची पाण्याची पातळी वाढली होती. सुनंदा या खाली उतरल्या. एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने नदी किनारी गेलेली महिला दिसत नसल्याची माहीती जवळच गांधारी पुलावर वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण यांना दिली.


माहिती मिळताच वाहतूक  पोलीस मच्छिंद्र चव्हाण  यांनी वार्डन संजय जयस्वाल यांच्यासह थेट नदी किनारा गाठला. पावसामुळे नदीच्या पाण्याचे पातळी वाढली होती. काही अंतरावर त्यांना महिलेची साडी तरंगताना दिसली. संशय आल्याने मच्छिंद्र आणि त्यांचा वॉर्डन जयस्वाल दोघे नदी पात्रातील जोरदार प्रवाहात  उतरले. त्यांनी साडी पकडली असता वृद्ध महिलेचा हात त्यांच्या हाताला लागला, नंतर दोघानी तिला पाण्या बाहेर आणले. 


त्या महिलेच्या नाका तोंडात पाणी गेल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी पोट दाबून पाणी बाहेर काढत तातडीने नजकीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. आता ती महिला सुखरूप आहे. मच्छिंद्र चव्हाण आणि संजय जयस्वाल हे दोघेही देवदूतासारखे धावून आल्यामुळं आमच्या आजीचे प्राण वाचले अशी प्रतिक्रिया महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.