Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कर थकबाकीदारांसाठी केडीएमसीने पुन्हा एकदा अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्याच्या 15 जूनपासून या योजनेला प्रारंभ होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


कोविड काळात आणि त्यानंतर केडीएमसी प्रशासनाने लागू केलेल्या या अभय योजनेला थकबाकीदार आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या पार्श्वभुमीवर ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार पुढील महिन्यापासून ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. 


या योजनेअंतर्गत पाणीपट्टी तसेच मालमत्तेच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेत 75 टक्के सूट (संपूर्ण थकाबकी एकरकमी भरल्यास) देण्यात येणार आहे. 15 जून ते 31 जुलै या कालावधीसाठी ही योजना लागू राहील. 


दरम्यान केडीएमसी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत थकीत कराची रक्कम तब्बल 1 हजार 800 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये व्यावसायिक मालमत्ता कराची थकबाकी सर्वाधिक आहे. त्यापैकी बरीचशी प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्याच्या वसुलीत अडथळा ठरत असल्याचे सांगत या अभय योजनेद्वारे 200 ते 250  कोटींची  रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होण्याचा विश्वास आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी व्यक्त केला.


त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या 'मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर' या अभियान अंतर्गत घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनप्रक्रिया करण्याकरीता महापालिका आरआरआर सेन्टर्स उभारणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केडीएमसी सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आदी जण उपस्थित होते.


केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने "मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर" हे अभियान 15 मे  ते 5 जून या 3 आठवड्यांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियांनातर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल सेंटर उभारण्यात येणार असून त्याअंतर्गत घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचा पुर्नवापर तसेच पुर्नवापर न करता येणाऱ्या वस्तू आणि साहित्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे.


कल्याण डोंबिवली शहरातील नागरिक घरातील व्यर्थ पण सुस्थितीतील साहित्य वा वस्तू जसे की, कपडे, चप्पल आणि बूट, दप्तरे, जुनी खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू आणि वापरलेली पण सुस्थितीतील पुस्तके इत्यादी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्थापित केलेल्या प्रभागस्तरीय आरआरआर सेन्टर्सला जमा करणे आणि या संकलित वस्तू पुनर्वापर, नूतनीकरण किंवा नवीन उत्पादने करण्यासाठी विविध भागधारकांना जसे की शहरातील कार्यरत कचरावेचक संघटना, एनजीओ, महिला बचत गट आणि पुनर्प्रक्रिया करण्याकरीता अधिकृत रिसायकलर्स यांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागस्तरीय आरआरआर केंद्र 20 मे  पासून 15 जून पर्यंत रोज सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत चालू राहील. आरआरआर केंद्र साधारण 5 स्वयंसेवकांद्वारे चालविण्यात येतील. ज्यामध्ये केडीएमसी प्रभाग क्षेत्रस्तरीय कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, कचरा वेचक संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. यामध्ये जमा झालेले साहित्य हे विविध रिसायकलर्स तसेच सामाजिक संस्था यांना पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियासाठी देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणून या आरआरआर केंद्राच्या ठिकाणी कापडी पिशव्या बनविणाऱ्या महिला बचत गट, त्वरिता महिला बचत गट यांना कापडी पिशवी विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.