Jitendra Awhad criticizes Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांना पाडायचे म्हणून त्यांना निधी द्यायचा नाही. आमच्या फायली अडकवल्या जातात. यावरून कळते की, राजकारणाची पातळी किती खालावली आहे. अजित पवार हे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना पाडायचे काम करत आहेत. कल्याणमध्ये येऊन बोलायचे ठाण्यात (Thane) गुंडगिरी वाढली आहे. तुमच्या पुण्यात (Pune) शरद मोहोळची (Sharad Mohol) हत्या होते. हे करून तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) अडचणीत का आणत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केला आहे. 


कळव्यातील एका मैदानाला महसूल विभागाने टाळे ठोकले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी मैदान परिसरात आंदोलन केले. हे मैदान बंद करण्यामागे अजित पवारांचा हात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेली दहा-बारा वर्ष आम्ही कचरा वगैरे साफ करून येथे चांगले मैदान बनवले.  मी कधीही इथे येत नाही, काम करून देतो आणि वापरायला देतो. इथे चांगले पीचेस आहेत. इथे चांगल्या खेळाडूंना मोफत प्रॅक्टिस सुरू असते.  इथे कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नाही. मात्र अजित पवार यांनी इथल्या अधिकाऱ्यांना देवगिरीवर बोलावले आणि हे मैदान उघडे कसे असे त्यांच्या भाषेत विचारले आणि ताबडतोब टाळे लावायला सांगितले. 


अजित पवार यांनी असे का केले?


कळव्यात एकही मैदान नाही.  मध्यंतरी श्रीकांत शिंदे यांनी इथे एक कार्यक्रम आयोजित केला. एक खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांना कोणी विरोध केला नाही. मात्र आता अजित पवार यांनी असे का केले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 


अजितदादा हे धंदे बंद करा


जर टाळे लावायचे असेल तर बाजूला 72 एकर जमीन आहे. त्याला टाळे लावा, ती जमीन खाल्ली जात आहे. तुम्ही नेहमी सांगता मी विकासाचे राजकारण करतो. मग या पोरांचा विकास नको आहे का? इथे एमसीए सिलेक्शन होते.  हे सुरू असताना यांनी पैठणकर नावाच्या अधिकाऱ्याला सांगून टाळे लावले.  इथे समस्त कळवेकर खेळायला येतात. ज्या मैदानाला लॉक लावायचे त्याला लावा. तुम्ही नशीबवान आहात शरद पवारांनी तुमच्या इथे स्टेडियम बांधले.  अजित दादा हे धंदे बंद करा, तुम्ही आणि तुमचा जो कोणी उमेदवार असेल तो यांच्या मनातून उतरला आहे.  मी आमदार आहे, मला पाडायचा प्रयत्न तुम्ही करू नका.  तुम्ही नेते आहात, मुख्यमंत्री म्हणून पुढे जाऊ शकता, असे काम करू नका, असे त्यांनी म्हटले आहे. 


लहान मुलांचे शाप वाईट असतात


दादा अशा छोट्या राजकारणात पडू नका. मला लाज वाटते मी काही वर्ष तुमच्या सोबत काम केले आहे. उद्या जर या मैदानाला टाळे असेल तर आम्ही इथे मुलांसह बसून आंदोलन करू. ही सगळी मध्यमवर्गीय माणसे आहेत. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला. त्यांच्या मुलाने कार्यक्रम घेतला. जर करायचे होते ते पण बंद करू शकत होते. मी त्यांना कॉल करून विचारले, ते पण म्हणाले मी असले काही करत नाही, मला काय करायचे आहे. त्यामुळे हे फक्त आणि फक्त अजित दादा यांनीच केले आहे.  लहान मुलांचे शाप वाईट असतात, त्यामुळे त्यांच्या वाट्याला जाऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 


राजकारणाची पातळी खालावली


या मैदानात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून ताबडतोब निर्णय घ्यावा. जितेंद्र आव्हाडांना पाडायचे म्हणून त्यांना निधी द्यायचा नाही. त्यांना काम करू द्यायचे नाही. त्यांच्या फायली अडकवल्या जातात. यावरून कळत आहे की, राजकारणाची पातळी किती खालावली आहे. अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांना पाडायचे काम करत आहेत. कल्याणमध्ये येऊन बोलायचे ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे. तुमच्या पुण्यात शरद मोहोळची हत्या होते. हे करून तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत का आणत आहेत, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केला आहे. 


आणखी वाचा 


Madha : मोहिते पाटलांची माढ्यातून माघार? सध्यातरी'वेट अँड वॉच'ची भूमिका, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसही कात्रीत