ठाणे : डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेला स्फोट (dombivali blast) आणि त्यात मृत्यू मुखी पडलेल्या नातेवाईकांचा आक्रोश आजही कंपनीजवळ ऐकायला मिळत आहे. त्यापैकीच, डोंबिवलीच्या आजदेपाडा येथे राहणारे एक जोंधळे कुटुंब. या जोंधळे कुटुंबातील मनोज जोंधळे डोंबिवलीतील (Dombivali) स्फोटापासून बेपत्ता आहेत. गेल्या 8 दिवसांपासून पती गायब असल्याने पत्नीने जीवाच्या आंकाताने आक्रोश व्यक्त केला आहे. पत्नी मनीषा यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. तीन मुलींचे वडिल असलेल्या मनोज यांच्या वाटेकडे पत्नी मनिषाचे डोळे लागले आहेत. मात्र, मनोज यांच्याबाबत ना कंपनी मालकाकडे उत्तर आहे, ना प्रशासनाकडे. त्यामुळ, मनोज यांचं काय झालं?, असा सवाल  8 दिवसांनंतरही आजही कायम आहे.  


मनोज जोंधळे हे नेहमीप्रमाणे अमुदान कंपनीच्या बाजूला असलेल्या कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. 23 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक कंपनीत स्फोट झाला, या स्फोटाची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका खेड्यात सुट्टीसाठी मनोज यांच्या पत्नी आपल्या तीन मुलीसह गावी गेल्या होत्या. डोंबिवलीमधील स्फोटाची बातमी ऐकल्यावर मानिषाने पती मनोजला फोनद्वारे संपर्क केला. मात्र, मनोजला संपर्क झाला नसल्याने मनीषा काही तासांतच घटनास्थळी दाखल झाल्या. पण, त्या ठिकाणी पती दिसून येत नसल्याने मनीषा यांनी पती मनोज यांची शोधाशोध सुरू केली. कंपनी परिसरात जाऊन पाहिले, डोंबिवलीतील रुग्णालये शोधले. मात्र, मनोज कुठेही दिसून आले नाहीत. या मनीषा पतीच्या शोधात आजही कंपनीकडे हेलपाटे मारत आहेत, आजही पती मनोज भेटतील या आशेवर आहेत .


अमुदान कंपनीच्या स्फोटातील घटनेला 8 दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेचा आठवडा उलटला, तरीही मनोज यांचा काहीही पत्ता लागत नाही. मनोज यांच्या पत्नी मनीषा दररोज घटनेच्या ठिकाणी येऊन आपले पत्नी सापडतील, या आशेने कंपनीच्या ढिगाऱ्याकडे हेलपाटे मारत आहेत. माझे पती याच ठिकाणी बसत होते, ते येथेच आहेत, त्यांना शोधा असा मनिषा यांचा आक्रोश उपस्थितांचे ह्रदय पिळटून टाकणारा आहे. मनोज यांचे मामा गायकवाड यांनीही भाचा मनोज यांच्यासाठी आक्रोश फोडल्याचं दिसून आलं. माझ्या भाच्याला आमच्या ताब्यात द्या, त्याचे काहीही झाले असले तरीही आम्हाला चालेल. मात्र, भाच्याला ताब्यात द्या, त्याच्या DNA टेस्टचे काय झाले, प्रशासनाने दखल घेऊन माझ्या भाच्याला आमच्या ताब्यात द्यावे. माझ्या भाच्याच्या पदरात 3 मुली असून एक अपंग आहे, त्यांचा सांभाळ कसा करा, असा टाहो फोडत मामाने डोंबिवली कंपनी परिसरात डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.  


बेपत्ता व्यक्तींसाठी कुठलीही मदत नाही


दरम्यान, डोंबिवली मृतांतील कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर केलीय. मात्र, या मदतीने त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती पुन्हा येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, डोंबिवली स्फोट प्रकरणी शासनाने मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केली असून जखमींचा रुग्णालयाचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे मात्र जे कामगार अजूनही बेपत्ता आहेत त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही जर शासनाने विशेष बाब म्हणून परिपत्रक काढले तर  बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत मिळू शकते. अन्यथा बेपत्ता झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सात वर्षे मदतीची प्रतीक्षा करावी लागणार, आहे.