ठाणे : डोबिवली एमआयडीसीतील स्फोटाची घटना ताजी असतानाच टंडन  रोडवरील चायनिजच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट (Dombivli Chinese Shop Blast) होऊन नऊजण जखमी झाल्याची घटना घडलीय. जखमी झालेल्या नऊजणांपैकी दोघेजण गंभीर असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे, या दुकानात सिलेंडर वापरायला कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे एमआयडीतील स्फोटाच्या प्रकरणानंतरही महापालिका प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय. 


आग विझवायला गेले आणि सिलेंडरचा स्फोट झाला


डोंबिवलीमधील सिद्धी चायनीज नावाच्या दुकानात स्फोट होऊन त्यामध्ये नऊजण जखमी झाले आहेत. बंद दुकानातून धूर निघत असल्याने टंडन रोड परिसरातील काही नागरिक आग विझवण्यासाठी गेले. पाण्याने आग विझवताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊजण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


विशेष म्हणजे या चायनीजच्या दुकानांमध्ये असलेल्या सिलेंडरचा वापर किंवा संबंधित विभागाच्या कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. कोणाच्या आशीर्वादाने असे अनधिकृत व्यवसाय कल्याण डोंबिवली महापालिकांच्या हद्दीत सुरू आहेत असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. 


डोंबिवली स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकाला पोलिस कोठडी


डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अमुदान या कंपनीत केमिकलचा स्फोट (Dombivli Blast) होऊन 12 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांना यामध्ये दुखापत झाली आहे. या स्फोटात अद्याप अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात 304 ए कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. 


या प्रकरणाचा तपास उल्हासनगर गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून फक्त शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले. 


मलय मेहता यांना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेला 29 मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली होती. आज मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. 


ही बातमी वाचा: