ठाणे : गरोदर महिलेला रुग्णालयात भरती करून न घेतल्याने तिची दारातच प्रसूती झाल्याच्या घटनेप्रकरणी डॉ. तृणाली महातेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या (Kalyan Dombivli Rukminibai Hospital) डॉ. तृणाली महातेकर यांना जबाबदार धरले


तीन महिन्यापूर्वी एका गरोदर महिलेस प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता तिला दाखल करुन घेतले नव्हते. त्यामुळे तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारातच झाली होती. त्या प्रकरणातील अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 


9 सप्टेंबर सायंकाळी 8 वाजता कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील एका गरोदर महिलेस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्याठिकाणी तिची अवघड अवस्था पाहून पादचारी आणि नागरीकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. तिला रुग्णालयात पोहचवण्याकरीता रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यामुळे तिला काही हमालांच्या मदतीने हातगाडीवर टाकून रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले गेले. 


त्याठिकाणी कार्यरत असलेल्या स्टाफने महिलेस प्रसूतीकरीता दाखल करुन घेण्यास नकार दिला. पुरेसा स्टाफ नसल्याचे कारण त्यावेळी देण्यात आलं. महिलेस दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारातच झाली. या प्रकरणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसेने प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत आंदोलन केले होती. ही बातमी एबीपी माझाने दाखवली होती.


ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली. घटनेच्या चौकशीअंती कारवाई करण्याचे संकेत पालिका उपायुक्तांनी दिले. घटनेवेळी उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं, वैद्यकीय अधिकारी आणि घटनेशी संबंधित लोकांचं स्टेटमेंट घेतलं. उपस्थितांकडून प्रकरणाची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले गेले. 


अखेर तीन महिन्यानंतर या घटनेस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली. या प्रकरणाची दखल घेत तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची चौकशी समिती नेमली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी  मनसेचे आमदार राजू पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. या चौकशी समितीने चौकशी करुन गरोदर महिलेस प्रसूतीकरीता दाखल करुन न घेण्यास डॉ. महातेकर या जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 


ही बातमी वाचा :