ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या किटकनाशक बनवणाऱ्या रासायनिक कंपनीत बुधवारी सकाळच्या सुमारास  स्फोट होऊन भीषण आग (Dombivli Fire) लागली. आग लागताच इंडो अमाईन्स कंपनीसह लगतच्या मालदे कॅपीसिटर्स कंपनीमधील कर्मचारी तात्काळ कंपनी बाहेर आल्याने मोठी जीवित हानी टळली. दोन्ही कंपन्यांचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे. 


गेल्या महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट होऊन डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात 16 कामगार मयत झाले आहेत. या स्फोटाने डोंबिवलीतील रहिवासी, उद्योजक अद्याप सावरले नसताना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान कार्यालये सुरू होत असतानाच इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीतील रासायनिक ज्वलनशील वस्तुंना आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. इंडो अमाईन्स कंपनीत शेतीविषयक उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांनी भरलेले पिंप आगीने लपेटताच कंपनीत स्फोटांची मालिका सुरू झाली. सुरूवातीला कंपनी कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण करताच कर्मचाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.


इंडो अमाईन्समधील कंपनीच्या ज्वाला जवळच्या मालदे कॅपीसिटर्स कंपनीत पोहचल्या. येथील सुमारे अठरा कर्मचारी तात्काळ कंपनीतून बाहेर पडले. या कंपनीत मीटरला लावणारे कॅपीसिटर्स तयार केली जातात. वीज वाहक तारांचे गठ्ठे या कंपनीत आवारात होते. या कंपनीत ज्वलनशील सामान असल्याने मालदे कॅपीसिटर्स कंपनीने पेट घेतला. या कंपनीतील प्लासिटने पेट घेताच काळ्या धुराचे लोळ आकाशाच्या दिशेने जात होते.


परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


आगीची माहिती मिळताच सुरूवातीला कल्याण डोंबिवली पालिकेचे तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे मारून परिसरातील कंपन्यांमध्ये आग पसरणार नाही याची काळजी घेतली. आगीच्या ज्वालांवर फोमचे फवारे मारून आग विझवली जात होती. ऊन वाढत गेल्याने आगीचा भडका होण्याची शक्यता असल्याने वाढीव आणखी आठ अग्निशमन बंब बोलविण्यात आले. चारही बाजूने इंडो अमाईन्स, मालदे कंपनीच्या आगीवर जवानांनी पाण्याचा सततचा मारा केला. पाण्याच मारा करूनही आगा आटोक्यात येत नसल्याने सुरूवातीला आजुबाजूच्या कंपनी मालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परिसरातील नागरिक वस्त्यांमध्ये घबराट पसरली होती.


पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण


सततचा पाण्याचा मारा करून अग्निशमन जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनांनी कंपनीत कोणीही कर्मचारी नसल्याची खात्रीशीर माहिती आपत्कालीन यंत्रणांना दिली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे एवढेच लक्ष्य आपत्कालीन यंत्रणांनी ठेवले होते. इंडो अमाईन्स, मालदे कंपनीचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. इंडो अमाईन्स कंपनीत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून उत्पादन घेतले जाते. तरीही या कंपनीला आग कशी आग लागली असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


इंडो अमाईन्स कंपनीला आग लागताच पोलिसांनी या कंपनीच्या परिसरातील रहिवाशांना घराबाहेर पडण्याच्या सूचना केल्या. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या कंपनी जवळील अभिनव शाळेतील विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेबाहेर काढून शाळेला सुट्टी देण्यात आली. कंपनी परिसरात उभ्या असलेल्या बस, रिक्षा, दुचाकी आगीत खाक झाल्या आहेत. यामधील काही वाहने कंपनी कर्मचाऱ्यांची असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.  तर  दुसरीकडे अमुदान कंपनी स्फोटानंतर राज्य शासनाने एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद केल्या. या प्रकाराने उद्योजक अस्वस्थ असताना, आता पुन्हा एमआयडीसीत रासायनिक स्फोट झाल्याने कंपनी चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.


या संदर्भात  पोलीस उपायुक्त,  सचीन गुंजाळ यांनी सांगितले कि, इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट होऊन कंपनीला आग लागली. ही आग जवळच्या माल्दे कॅपीसिटर्स कंपनीत पसरली. या दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी नव्हते. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. वित्त हानी झाली आहे. या कंपन्यांच्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन जवानांना यश आले आहे. तर अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले कि,  १३  फायरच्या गाड्या आणि अनेक पाण्याचे टँकरच्या सहाय्याने  आग नियंत्रणात आणली आहे. आग कशामुळे लागली हे आता तपासानंतर स्पष्ट होईल. तांत्रिक कारण हेच आगीचे कारण असते. या आगीचे कारण चौकशीतून स्पष्ट होईल.


मंत्री रवींद्र चव्हाण काय म्हणाले?


सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज या घटनास्थळाचे पाहणी केली यावेळी बोलताना मंत्री चव्हाण यांनी एखादा उद्योजक मेहनत करून बँकांचे कर्ज घेऊन कंपनी उभी करतो कोणत्यातरी निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असतात. एकंदरीतच कंपन्यांमध्ये सेफ्टी नॉम्स कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत. यासाठी यंत्रणा उभे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले . 


अति धोकादायक केमिकल कंपन्यांना स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी एखादा उद्योग उभा राहतो त्यामध्ये फक्त उद्योगच उभा राहत नाही तर त्या भागातील सर्व परिसरात अनेक जण त्यावर त्या उद्योगावर अवलंबून असतात. त्यामुळे स्थलांतरणाचा निर्णय घेताना या सर्व बाबींचा विचार होणे देखील गरजेचे आहे  1970 71 च्या दरम्यान पहिल्यांदा एमआयडीसी या ठिकाणी आली त्यानंतर आजूबाजूला नागरिकरण वाढलं . एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांबाबत सरकार आणि संबंधित विभागाने उपाययोजना तसेच फायर ऑफिसर याची नेमणूक करणे, दुर्घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे असे सांगितले. 


ही बातमी वाचा: