Crime News: उल्हासनगरजवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्येच एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडली तेव्हा हा कर्मचारी कामावर होता. सचिन कदम असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो या आगारात मेकॅनिक म्हणून काम करतो. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. 


एसटी संपात सचिन कदमदेखील सहभागी झाले होते. त्याच रागातून आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सचिन यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  या त्रासाला कंटाळून अखेर सचिन ने झोपेच्या प्रमाणापेक्षा जास्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याआधी त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव नमूद करत पत्र लिहीले होते. 


सचिनसह इतर कर्मचाऱ्यांनादेखील याच कारणावरून त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेकॅनिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी संपात सहभागी झाल्याचा राग मनात धरून सचिन यांना मानसिक त्रास देतात असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने अखेर सचिन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा दावा त्यांनी केला.


सचिन कदम यांनी झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब इतर एसटी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ सचिन कदम यांना उल्हासनगरमधील रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सचिन कदम यांचा मानसिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 


विलीनीकरण, वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यांहून अधिक काळ संप केला. कमी आणि अनियमित वेतनामुळे काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्यांच्या घटनांमुळे मोठी नाराजी कर्मचाऱ्यांमध्ये होती. एसटी संप मागे घेतल्यानंतर एसटी सेवा सुरळीत होत असताना या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: