Aurangabad Crime News: वैजापुर शहरातील हायवे चौफुलीवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन ट्रक चालकांनी फिल्मी स्टाइल राडा घालत चक्क टॉमी व चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर किरण काकासाहेब शिंदे (वय 21) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. 

Continues below advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हा ट्रक चालक असून, शुक्रवारी रात्री वैजापूर शहरातील गंगापुर चौफुलीवरील एका हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी थांबला होता. जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या बाजूलाचा पेट्रोल पंप असल्याने गाडीत डीझेल भरण्यासाठी तो तिथे गेला. त्यावेळी पंपावर एका वाहनात डीझेल भरणं सुरु होते. मात्र डीझेल भरल्यानंतरही संबधित वाहनचालकाने ट्रक बाजूला घेतला नाही. त्यामुळे उभा असेलला ट्रक बाजूला घेण्याची विनंती किरण याने त्या वाहनचालकाला केली. परंतु वाहन बाजूला न घेता समोरच्या वाहन चालकाने शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरु झाला. 

थेट चाकू हल्ला!

Continues below advertisement

त्यांनतर वाद एवढा वाढला की, समोरच्या वाहन चालकाने टॉमीने व दुसऱ्याने चाकूने किरणवर हल्ला केला.चाकू हल्ल्यानंतर किरण जागेवर कोसळला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या किरणला सुरवातीला वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,त्याला अस्वस्थ वाटत असल्याने पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक वाहन चालक व त्याच्या सोबत असलेल्या असे दोन अनोळखी व्यक्तिविरोधात शिविगाळ करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी वैजापुर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद... 

पेट्रोल पंपावर दोन्ही वाहनचालकांमध्ये डीझेल भरण्याच्या वादावरून झालेल्या हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यात किरणला आरोपींकडून होत असलेली  मारहाण स्पष्ट दिसत आहे. तर यावेळी तिथे उपस्थित काही लोकांकडून वाद सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात होता. मात्र मारहाण करणारा वाहनचालक आणि त्याचे  साथीदार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत होते.