ठाणे : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सध्या आपल्या 25 व्या वर्धापनदिनाचा रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. 1 ऑक्टोबर 2000 रोजी स्थापन झालेल्या बीएसएनएलने खेड्यापासून डिजिटल इंडियापर्यंत राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ठाणे आणि पालघर विभागातील शहरी व ग्रामीण ग्राहकांना 2026 पर्यंत अधिकाधिक नवनवीन सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती कोकण विभागीय मुख्य व्यवस्थापक महेश कुमार यांनी दिली.
गेल्या 25 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा मागोवा घेतला तर 2002 मध्ये बीएसएनएलने GSM मोबाइल सेवा सुरू केली, 2005 मध्ये ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून दिली, तर 2010 मध्ये ग्रामीण भागात टॉवरचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. 2015 मध्ये भारतनेट प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडले गेले. त्यानंतर 2017 मध्ये एंटरप्राइज सेवा, 2020 मध्ये कोविड-19 दरम्यान अखंडित दूरसंचार सेवा, आणि 2022 मध्ये भारत फायबरद्वारे ग्रामीण-शहरी भागात हाय-स्पीड इंटरनेट पोहचवले गेले.
2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सी-डॉट, तेजस आणि टीसीएसद्वारे विकसित स्वदेशी 4G/5G सेवांचा शुभारंभ झाला आहे. ही तंत्रज्ञान परदेशी अवलंबित्व कमी करून राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि डिजिटल स्वातंत्र्याला बळ देणार आहे.
संकटकाळात बीएसएनएलने नेहमीच पुढाकार घेतला आहे. भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींत नेटवर्कचे जलद पुनर्स्थापन, कोविड-19 दरम्यान रुग्णालये आणि प्रशासनाला अखंडित कनेक्टिव्हिटी, तसेच लेह-लडाख आणि नक्षलग्रस्त भागातही सेवा सुरू ठेवण्यात आल्या. उपग्रह मोबाइल सेवेद्वारे आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षेतही कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सध्या बीएसएनएलकडे 44 लाखांहून अधिक भारत फायबर (FTTH) कनेक्शन्स, 9 कोटींहून अधिक मोबाइल ग्राहक, लीज्ड लाइन, MPLS, VPN आणि क्लाउडसारख्या एंटरप्राइज सेवा तसेच उपग्रह सेवा उपलब्ध आहेत.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने बीएसएनएल ठामपणे वाटचाल करीत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयासाठी बीएसएनएल शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांपर्यंत परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या डिजिटल सेवा पोहचवणार आहे. ग्रामीण टॉवर्स, फायबर नेटवर्क आणि स्वदेशी 5G-6G संशोधनासह डिजिटल बँकिंग व सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
ही बातमी वाचा: