ठाणे : डोंबिवलीत (Dmobivli) अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. नवरात्रीच्या (Navratri) भंडाऱ्यात जेवण करायला गेलेला 13 वर्षांचा मुलगा नाल्याचे झाकण उघडे असल्याने त्यात पडला. मुलाचे आई-वडील त्याला वाचवण्यासाठी मदत मागत होते, हंबंरडा फोडून याचना करत होते. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांची संवेदना मेली होती. आई-वडिलांच्या ओरडण्याकडे, हाता-पाया पडण्याकडे दुर्लक्ष करत लोक भंडाऱ्यातील जेवण करण्यात मग्न होते. दोन तासांनी त्या मुलाला बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता.
तब्बल दोन तास आयुष त्या नाल्यात होता. लोकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अर्धा तास जरी आधी उपचारासाठी आणले असते तर आयुषचा जीव वाचला असता असं डॉक्टर म्हणाले. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या महापालिका आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. तर या नाल्याच्या चेंबरचे झाकण देवीच्या मंडळाने काढले, त्या नाल्यात अन्न आणि कचरा टाकला, त्यामुळेच ही घटना घडली असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.
Dombivli News : भंडाऱ्याचे जेवण करायला गेला अन् जीव गेला
डोंबिवली पश्चिमेत सरोवर नगर परिसरात नवरात्र उत्सव सुरू आहे. रविवारी रात्री या परिसरात राहणारा 13 वर्षाचा आयुष कदम घराजवळ असलेल्या भंडाऱ्याचे जेवण करून येतो असे आई वडिलांना सांगून गेला आणि तो घरी परतलाच नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष आणि त्याचे मित्र खेळत असताना आयुषचा नाल्यात तोल गेला आणि तो गायब झाला. सोबत असलेल्या मित्राने हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. शेवटी त्याने आयुषच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली.
Dombivli Accident : आई-वडिलांचा हंबरडा, लोकांचा असंवेदनशीलतेचा कळस
आयुषचे आई वडील देवीच्या मंडपाजवळ पोहोचले. मंडपाजवळ असलेल्या नाल्याच्या उघड्या झाकणातून आयुष खाली पडल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे आयुषच्या आई-वडिलांनी मंडपाजवळ जेवण करणाऱ्या लोकांना आणि त्या ठिकाणी भांडी घासणार्या महिला-पुरुषांना आपल्या मुलाला वाचवण्यासाठी विनवणी केली. परंतु कोणीही आयुषच्या कुटुंबीयांना दाद देत नव्हते.
आई-वडिलांनी फोडलेल्या हंबरड्यानंतर काही तरुण पुढे आले. त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांच्याकडे आवश्यक सामग्री उपलब्ध नसल्याने अग्निशमन कर्मचारी नाल्यात उतरला तयार नव्हते. अखेर वेदांत जाधव हा तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरला.
Ayush Kadam Tragedy : दोन तासांच्या शोधानंतर आयुष सापडला पण...
दोन तासाच्या शोधानंतर आयुषला बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आयुषला अर्धा तास आधी उपचारासाठी आणले असते तर त्याचा जीव वाचला असता असं डॉक्टर म्हणाले.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख बाळा म्हात्रे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 25 लाखाची मदत प्रशासनाने केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
Dombivli Ayush Kadam Death : लोकांच्या निष्काळजीपणामुळे आयुषचे आयुष्य संपले
या प्रकरणात नाल्याचे झाकण उघडे राहण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहावं लागेल. आयुषच्या कुटुंबाला काय आणि किती मदत होईल हा नंतरचा भाग आहे. परंतु महापालिका आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या असवेदनशीलमुळे आयुषच्या आयुष्य संपले.
KDMC Navratri News : मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झाकण काढलं
कल्याण डोंबिवली महापालिका शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, घटनास्थळी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली नाल्यावर झाकण होते अशी माहिती मिळाली. देवीच्या मंडळाने त्या नाल्यावरील झाकण काढून त्या ठिकाणी भांडी घासली आणि कचरा नाल्यात टाकल्याचं निदर्शनास आले असं त्या म्हणाल्या. या दुर्दैवी घटनेला महापालिका जबाबदार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ही बातमी वाचा: