भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi News) गोविंदा सहाव्या थरावरून कोसळल्यानंतर गेली 14 वर्षे अंथरुणाला खिळलेल्या ठाणे जिल्ह्यातील गोविंदाची विचारपूस करण्यास ना सरकार फिरकले ना दहीहंडी आयोजक फिरकले. सरकारकडून नोकरी नाही किंवा कोणतीही मदत या गोविंदाला मिळाली. नागेश भोईर असे या गोविंदाचे नाव असून तब्बल 14 वर्षे तो आपल्या आजाराशी झुंज देत आहे.


दहीहंडी उत्सवात लागणारी उंच थरांची स्पर्धा पाहतो परंतु या गोविंदाची जबाबदारी घ्यायला ना सरकार तयार आहे नाही आयोजक. आता नागेशचे वय 38 असून तो गेल्या चौदा वर्षांपासून अंथरुणावरच आहे. नागेश च्या उपचाराकरता मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे . सुरुवातीच्या काळात मित्रमंडळींनी मदत केली परंतु जस जसा उपचाराचा खर्च वाढला त्यानंतर कोणीही विचारपूस करायला देखील फिरकले नाही. नागेश हा भिवंडी येथे राहत असून 2009  साली तो भिवंडी येथील टिळक चौकात दहीहंडी फोडताना सहाव्या थरावरून कोसळला. त्याच्या पाठीच्या मणक्याला जोरात मार लागला. तो आजपर्यंत अंथरुणाला खिळून आहे.


आपल्या तरुण पोरांना मृत्यूच्या दाढेत अथवा जायबंदी होण्याच्या संकटात ढकलू नका, दहीहंडीच्या दिवशी जेव्हा गोविंदा घरातून बाहेर पडतो त्यावेळी आई वडील मुलगा घरी कधी येईल याची वाट पाहत असतात. मात्र मुलासोबत झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आई-वडिलांना काय वाटत असेल हे त्यांनाच माहीत असते. त्यामुळे आपल्या तरुण पोरांना मृत्यूच्या दाढेत ढकलू नका असे  भावनिक आवाहन नागेशची आई नलिनी भोईर यांनी केले आहे. तसेच दहीहंडी उत्सवात अपंगत्व आलेल्या गोविंदांना मंडळाच्या वतीने तसेच आयोजकांच्या व सरकारच्या वतीने देखील फक्त आश्वासनच दिली जातात.  मात्र प्रत्यक्षात कोणी मदत देखील करत नाही अशी खंत देखील कुटुंबीयांनी व्यक्त करून दाखवली.


अपंगत्व आलेल्या गोविंदाला आजही आपल्या पायावर उभा राहण्याची अपेक्षा आहे मात्र सरकारने त्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही याची खंत नागेशला वाटत आहे. नागेश गेली 14 वर्ष अंथरुणाला खिळून आहे.  मनोरंजनासाठी तो मोबाईल वर व्हाट्सअॅपवर तसेच  टीव्हीवर बातम्या पाहून आपले दिवस काढत आहे . नागेशच्या उपचारासाठी हवी तशी मदत कोणाकडून मिळत नसल्याने त्यांनी आता अपेक्षाही सोडले आहेत परंतु आज ही त्याची पायावर उभा राहण्याची जिद्द कायम आहे. सरकारकडून तसेच आयोजकांकडून आता आश्वासन नको मदतीची अपेक्षा आहे अशी खंत नागेश यांनी व्यक्त केली आहे.


हे ही वाचा :


Dahihandi Pune : दहीहंडी जल्लोषाला गालबोट; कुठे धारदार शस्त्राने वार तर कुठे हाणामारी...