Bhiwandi News : भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) दमदार कामगिरी करत सात अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांनी केलेल्या 23 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले आहे. या अटक केलेल्या गुन्हेगारांकडून लाखोंचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. याच गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता भिवंडीचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी व्यक्त केली आहे. पोलीस पथक त्या दिशेने तपास करत असल्याचे आज शांतीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत माहिती देताना प्रसारमाध्यामांना सांगितलं.


भिवंडी शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यासह मोबाईल आणि घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस उपआयुक्त ढवळे यांनी हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्याला आळा घालण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार शांतीनगर पोलिसांच्या पथकाने शिताफीने शोध घेऊन वाहने चोरी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत. बिलाल रिजवान अन्सारी (वय 27 वर्षे, रा. मालेगाव ) मोहम्मद सैफ शफिक खान (वय 24 वर्षे, शांतीनगर भिवंडी) ,राहील फकीरउल्ला अन्सारी (वय 26 वर्षे, रा. गौबीनगर भिवंडी) असे वाहने चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे भिवंडीतील दोन आरोपी हे शहरातील दुचाक्यांसह रिक्षांची चोरी करुन मालेगाव भागात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या गुन्हेगार त्रिकूटाकडून 19 वाहन चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.


या तीन गुन्हेगारांपैकी बिलाल याला तांत्रिक आणि बातमीदारच्या आधारे मालेगावातून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे, संतोष तपासे, पोलीस हवालदार रविंद्र चौधरी, महेश चौधरी, रिजवान सैयद, पोलीस नाईक किरण जाधव, श्रीकांत पाटील, किरण मोहिते, पोलीस शिपाई रविंद्र पाटील, नरसिंह क्षीरसागर, दीपक सानप, मनोज मुके, तौफिक शिकलगार, विजय ताटे या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. त्यानंतर त्याने वाहने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचे भिवंडीत राहणाऱ्या दोन साथीदारांचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली.


या अटक गुन्हेगारांकडून 14 दुचाक्या, 4 रिक्षा असे 18 वाहने आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. या गुन्हेगारांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 वाहने चोरी केल्याचे समोर आले असून यापूर्वीही शांतीनगर पोलीस पथकाने 19 वाहन चोरीचे गुन्हे उघकीस आणले असून एकूण 38 वाहन चोरीचे गुन्हे महिन्याभरात उघडकीस आणले आहे. या अटक गुन्हेगारांकडून 7 लाख 90 हजार रुपये किंमतीचे वाहने आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे.


दीड लाखांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना बेड्या


भिवंडी शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिसांनी सतर्कतेने तपास करत असताना मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे. या दोघांकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 8 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. योगेश चंद्रलाल माखिजा (वय 35 वर्षे रा. उल्हासनगर,)  करण रशमीन गडा (वय 21 वर्षे रा.डोंबिवली) या दोघांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून गुन्हे करताना वापरात असलेली एफ झेड दुचाकी आणि विविध मोबाईल कंपनीचे  अँड्रॉईड मोबाईल असा मुद्देमाल जप्त करत शांतीनगर आणि मानपाडा पोलीस ठाणे येथील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत .


तीन लाखांची घरफोडी करणारे दोन गुन्हेगारांना अटक


भिवंडी शहरातील श्रीरंग नगर येथील एका बंद घरात घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 35 हजार रोख रक्कम आणि 2 लाख 58 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश मिळाले आहे.


श्रीरंग नगर येथील कृष्णगोपल विश्वनाथ प्रसाद केसरी यांच्या घरात 14  मे रोजी झालेल्या घरफोडीत सुमारे 2 लाख 93 हजार 150 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाली होती. या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे, यांनी या चोरीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या पोलीस पथकासह गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवत गुन्हेगार नवाज हिदायदउल्ला खान (रा. गैबी नगर) , अशफाक मजहरअली अन्सारी (रा जैतूनपुरा) अशा दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी शिताफीने आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेला सर्वच  मुद्देमाल हस्तगत करुन त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील हे करत आहेत.