Bhiwandi Crime Police News : भिवंडी शहरा लगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामात 8 जानेवारी रोजी झालेल्या एका चोरीच्या घटनेचा कसोशीने तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. असताना निजामपुरा पोलिसांनी घटनास्थळावर आढळून आलेली रिकामी पाण्याची बाटली आणि चिप्स पॉकेट्सचे रॅपर यावरून चोरट्याचा माग काढून त्यास जेरबंद केलं आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला 99 लाख 39 हजार 260 रुपये किमतींचा गारमेंट कपडा आणि पाच हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त केला आहे.


परशुराम सरवदे असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिठपाडा खोणी येथे ऍडोन एक्स्पोर्ट नावाच्या कंपनीचे गोदाम असून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे शर्ट, पॅन्ट, टीशर्ट, पडद्याचा कपडा, पॅन्टच्या पॉकेटला लावण्यात येणारा कपडा, सलवार सुटचा कपडा आणि तयार सलवार सूटचा कपडा ठेवलेला होता.


त्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तेथील माल चोरी केल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळावर रिकामी पाण्याची बाटली आणि वेफर्सची रिकामे रॅपर आढळून आले. आरोपीने चोरी करीत असताना तेथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुद्धा चोरी केलेला असल्यामुळे त्याबाबतचा कोणताही पुरावा चोरट्याने मागे ठेवलेला नव्हता. 


बाटली आणि रिकाम्या रॅपरवरुन पोलिसांनी काढला माग


पोलीस पथकाने पाण्याची रिकामी बाटली व वेफर्स रिकामे रॅपर परिसरातील कोणत्या दुकानातून खरेदी केलेले आहे. या बाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एका हॉटेलमधली ही बाटली असल्याचे समजले. तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या फुटेजमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार परशुराम सरवदे हा पाण्याची बाटली खरेदी करताना आढळून आला.


पोलिसांची कमाल कामगिरी, आरोपी ताब्यात, मुद्देमालही जप्त


त्यानंतर पोलीस पथकाने संशयित आरोपी परशुराम सरोदे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचा तांत्रिक तपास करीत आरोपी हा अंजुरफाटा साठे नगर या ठिकाणी असल्याची माहिती निष्पन्न झाल्यानंतर पोलीस पथकाने त्यास सापळा रचून अटक केली आहे.आरोपी परशुराम सरवदे याने आपल्या इतर तीन ते चार साथीदारांसह ही चोरी केल्याचे कबूल केले असून त्याच्या ताब्यात असलेला सर्वच्या सर्व  मुद्देमाल हस्तगत करण्यात निजामपूरा पोलिसांनी यश मिळवले आहे .


ही बातमी देखील वाचा