Bhiwandi Chemical Blast : भिवंडीमध्ये आग आणि स्फोटांचे सत्र सुरुच आहे. भंगार गोदामात बिडी ओढत काम करणे कामगारांच्या जीवावर बेतलं आहे. मृतांमधील एक जण बिडी ओढत असतानाच बिडीची ठिणगी केमिकल ड्रममध्ये पडताच मोठा स्फोट होऊन दुर्घटना घडली आहे. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरालगत असलेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागातील घरत कंपाउंडमधील भंगार गोदामात घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 


बिडीची ठिणगी केमिकल ड्रममध्ये पडताच मोठा स्फोट


भंगार गोडाऊनमध्ये उघड्यावरच केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम आज सकळाच्या सुमारास दोघे कर्मचारी करत होते. त्यातच एकाला बिडी ओढण्याची तलप आल्याने त्याने बिडी पेटवत बिडी पिण्यास सुरुवात केली. मात्र, बिडीची ठिणगी केमिकल ड्रमच्या संपर्कात आल्याने केमिकल ड्रामाचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. तसेच आजूबाजूच्या इमारतींचे खिडकीच्या काचा देखील फुटल्या. स्फोट इतका भीषण होता की दोन्ही कामगारांचा मृतदेह 50 ते 60 फूट हवेत उडून दूरवर फेकले गेले होते आणि भंगार गोदामाला देखील आग लागली होती. 


या आगीवर भिवंडी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून घटनास्थळी भिवंडी निजामपूर पोलीस दाखल झाले असून पोलीस पंचनामा करत आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करता स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच हे गोदाम अनाधिकृत असून या ठिकाणी हे केमिकल कसे आणि कुठून आणण्यात आले या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.


भिंवडीत जानेवारी महिन्यातही आगीच्या 10 घटना 


भिवंडी शहरी आणि ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात लहान मोठ्या आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भिवंडी तालुक्याची ज्वालामुखीचा तालुका अशी ओळख निर्माण  झाली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 200 हून अधिक आगीच्या घटना घडल्याच्या भिवंडी  अग्निशमन दलाच्या कार्यलयातील नोंदीवरून उघडकीस आले आहे. त्यातच यंदाच्या जानेवारी महिन्यातही आगीच्या 10 घटना घडल्या तर, आज 1 फेब्रुवारी रोजी खोका कंपोउंड येथे ऑईल गोदमला आग लागली होती, त्यानंतर दुसऱ्या आगीची घटना 9 वाजल्याच्या सुमारास भिवंडीत घरत कंपाऊंड येथे केमिकल ड्रमचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत रमजान कुरेशी (वय 46) आणि ईशराईल शेख (वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. 


आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ


भिवंडी शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रमाग कारखान्यासह कापड साठवलेल्या गोदामांना तसेच डाईंग साइजिंगला आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गोदामे असून  यामधील काही गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल गोदामांसह भंगार आणि इतर साहित्याच्या गोदामांना आगी लागण्याच्या घटना नियमित घडत असतात. 


गोदामात बेकादेशीर घातक रसायनांचा साठा


भिवंडीत लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये सर्वाधिक भंगाराची गोदामे जळत असून केमिकल आणि यंत्रमाग कारखान्यांना आगी लागल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. या ठिकाणी गोदामात बेकादेशीर घातक रसायनांचा साठा आढळून आल्यावर कारवाईचे आदेश असताना देखील आजही काही ठिकाणी छुप्या रित्या घातक रसायनांचा साठा साठवून केली जात असल्याची माहिती अनेक वेळा पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत उघड झाली आहे. मात्र तरी देखील अशा उघड्यावर बिनधास्तपणे केमिकलचा वापर होत आहे. यामुळे मोठा स्फोट होण्याची दाट शक्यता आहे, हे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.