Bhiwandi Accident : भिवंडीत (Bhiwandi) रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे (Potholes) वाहतूक पोलिसाच्या दुचाकीला भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात मागून येणाऱ्या भरधाव ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. शहरातील टेमघर (Themghar) परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब कुंभारकर (वय 40 वर्षे, राहणार-भादवड) असं अपघातातील मृताचं नाव आहे तर सुजय शिवाजी नाईक (वय 42 वर्षे, राहणार कल्याण) असं जखमी पोलीस हवालदाराचं नाव आहे. ते नारपोली वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.
पेव्हर ब्लॉक (Paver Block) निघाल्याने भिवंडी-कल्याण मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं
शहरातील भिवंडी-कल्याण मार्गावर (Bhiwandi-Kalyan Road) काही ठिकाणी डांबरीकरण तर काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आलं आहे तर बऱ्याच ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघाल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलं आहे.
कसा घडला अपघात?
वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुजय शिवाजी नाईक हे भिवंडी कल्याण मार्गावरुन आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरुन जात होते. यावेळी त्यांची दुचाकी पेव्हर ब्लॉक निघालेल्या खड्ड्यात पडली आणि त्यांचं नियंत्रण बिघडल्याने पोलीस हवालदार तसंच त्यांचे मित्र भाऊसाहेब कुंभारकर दोघेही रस्त्यावर पडले. मात्र त्याच वेळी मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना चिरडलं. या अपघातामध्ये पोलीस हवालदार सुजय नाईक थोडक्यात बचावले असून त्यांचा हात मोडला आहेत. तर त्यांच्या मित्राच्या अंगावरुन ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
गंभीर जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु
घटनेनंतर पोलीस हवालदार नाईक यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर मृत भाऊसाहेब कुंभारकर यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनकरता शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला. परंतु शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतलं असून शांतीनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अंबरनाथमध्ये ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू
ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीत आठवडाभरापूर्वी घडली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने खड्डा खोदला होता. या खड्ड्यात पाणी देखील साचलं होतं. मात्र खड्ड्याभोवती कोणत्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपायोजना किंवा बॅरिकेडिंग केलेली नव्हती. याच परिसरात राहणारे सुरज राजभर (वय 8 वर्षे) आणि सनी यादव (वय 6 वर्षे) हे याठिकाणी खेळत असताना खड्ड्यात पडले आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. यानंतर हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.