Badlapur Crime : बदलापूरमधील (Badlapur) शिवसेनेचे (Shiv Sena) माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अविनाश मोरे यांच्यावर मंगळवारी (20 सप्टेंबर) रात्री हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. विशाल आचार्य असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पूर्ववैमनस्यातून अविनाश मोरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत.


ठोशाबुक्क्यांनी मारहाण, पिस्तुल दाखवत जीवे मारण्याची धमकी
बदलापूरमधील माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे हे मंगळवारी रात्री शिरगाव आपटेवाडी परिसरातून इनोव्हा कारने त्यांच्या घरी जात होते. यावेळी महेंद्र उर्फ पप्पू बागुल आणि विशाल आचार्य या दोघांनी टोयोटा कोरोला गाडी मोरे यांच्या गाडीसमोर आडवी घातली. यानंतर पप्पू बागुलने मोरे यांच्याजवळ जात त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पिस्तुल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. 


एका आरोपीला बेड्या, 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अविनाश मोरे हल्ल्या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विशाल आचार्य याला त्याच्या गाडीसह ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.


पूर्ववैमनस्यातून अविनाश मोरे यांच्यावर हल्ला : पोलीस
या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू बागुल याने 2013 साली शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी म्हात्रे यांचे समर्थक असलेल्या आऊ मोरे यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. त्याच रागातून मोरे यांच्यावर नऊ वर्षांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बदलापुरातील प्रामाणिक नेते आणि 'मास लीडर' अशी शरद म्हात्रे यांची ओळख आहे. जुलै 2013 मध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.


मुख्य आरोपी सराईत गुंड
दरम्यान पप्पू बागुल हा सराईत गुंड असून त्याच्यावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी दोन पथकं रवाना केली आहेत. लवकरच त्याच्या मुसक्या आवळू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


इतर बातम्या