Navratri 2022: यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार शिंदे गट की उद्धव ठाकरे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असतानाच आता कल्याण मधील किल्ले दुर्गाडी येथे गेली 54 वर्ष साजरा होणाऱ्या नवरात्री उत्सवासाठी देखील शिंदे गट व ठाकरे गटात रस्सीखेच दिसून येत आहे. शिवसेनेकडून 54 वर्षापासून किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी शिवसेना शहर प्रमुख या उत्सवाचे प्रमुख असतात. यंदा मात्र या उत्सवावर देखील शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट वादाचं सावट आहे. शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिंदे गटातील शहर प्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून देखील जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी मागितली आहे. दोन्ही बाजूंनी परवानगी आम्हालाच मिळणार, असा दावा केला जात आहे. एकंदरीत या उत्सवाची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1968 साली किल्ले दुर्गाडीवर पूजा अर्चा करण्यासाठी बंदी हूकूम जारी करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक बंदी हूकूम मोडून देवीची पूजा केली होती. तेव्हापासून आजर्पयत 54 वर्षापासून दरवर्षी शिवसेनेकडून किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. किल्ले दुर्गाडी देवीच्या नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष हा शिवसेनेचा शहर प्रमुख असतो. मात्र यंदा राजकीय स्थिती वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आहेत. सगळीकडे या दोन्ही गटाकडून दावा सांगिता जात आहे. दसरा मेळाव्यावर या दोन्ही गटात जुंपलेली असताना आत्ता कल्याणमधील किल्ले दुर्गाडी देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी विविध परवानग्या शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकारी यांच्याकडे पवानगी मागितली आहे.
बासरे यांनी सांगितले की, पोलिस प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले की, त्यांचा अहवाल जिल्हाधिकार्यांशी यांना पाठविला गेला आहे. त्यांच्याकडून परवानगी येणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकार्यांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शहर प्रमुख परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. परवानगी मिळताच उत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान शिंदे गटाला समर्थन देणारे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्याची परवानगी पोलिस प्रशासनाकडे मागितली आहे. त्यांच्याकडूनही उत्सव साजरा करण्यावर दावा करण्यात आलेला आहे. नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या परवानगीवरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आलेले आहेत. आत्ता जिल्हाधिकार्यांकडून नवरात्र उत्सवाची परवानगी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.