Amruta Fadnavis Case : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) ही जेलमधून सुटल्यानंतर उल्हासनगरच्या (Ulhasnagar) तिच्या घरी परतलेलीच नाही. त्यामुळे चौकशी आणि माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनिक्षा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे.


जामीन मिळाल्यानंतर अनिक्षाची जेलमधून सुटका


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला 16 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक केली होती. यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. अनिक्षाला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी मुंबईच्या भायखळा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. ही न्यायालयीन कोठडी आता संपली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने 27 मार्च रोजी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिक्षाला जामीन मंजूर केला होता. अनिक्षाच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला की, अनिक्षाचा ब्लॅकमेलिंग प्रकरणात थेट सहभाग नाही. अनिक्षाचे अमृता फडणवीस यांच्यासोबतचे नाते नेहमीच चांगले राहिले होते. अनिक्षाला राजकीय कारणावरुन या प्रकरणात ओढण्यात आलं आहे. यानंतर न्यायालयाने अनिक्षाला जामीन मंजूर केला. त्यानंतर कालच तिची भायखळा कारागृहातून सुटका झाली होती.


उल्हासनगरच्या घरी अनिक्षा परतलीच नाही!


भायखळा कारागृहातून सुटका झाल्यानंतर ज्या घरातून अनिक्षाला अटक करण्यात आली होती, तिथे ती परतेल, अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात अनिक्षा उल्हासनगरच्या तिच्या घरी परतलेलीच नाही. 


अनिक्षा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता


उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील मायापुरी अपार्टमेंटमध्ये 801 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अनिक्षा राहत होती. मात्र या फ्लॅटला अजूनही कुलूपच आहे. त्यामुळे चौकशी आणि माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनिक्षा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


अनिक्षा जयसिंघानियावर आरोप काय?


फौजदार प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न आणि अमृता फडणवीस यांच्याकडून दहा कोटी रुपयांची वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनिक्षा जयसिंघानियावर आहे. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर 20 फेब्रुवारी रोजी दक्षिण मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आणि तिची भायखळा जेलमधून सुटका झाली. 


दरम्यान पोलिसांनी अनिक्ष जयसिंघानियाचे वडील बुकी अनिल जयसिंघानिया तसंच नातेवाईक निर्मल जयसिंघानिया या दोघांना गुजरातमधून 20 मार्च रोजी अटक केली होती. ते पोलीस कोठडीत आहेत. या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटळला.


VIDEO : Amruta Fadnvis Blackmail Case : जामीन मिळाल्यापासून अनिक्षा जयसिंघानी 'गायब'