Ambernath Latest News Update : अंबरनाथमधील सावित्रीनं नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेय.. होय, येथील मलंगगड परिसरात मध्यरात्री बिबट्याने एका कुटुंबावर हल्ला केला होता. धाडसी पत्नीनं बिबट्याचा प्रतिकार करत नवऱ्याला आणि मुलीला वाचवलं. या महिलेचं नाव सखूबाई असं आहे. तिने मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्याचा धाडसाने प्रतिकार केला अन् आपल्या कुंकवाला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं. बिबट्याच्या हल्ल्यात पती जखमी, तर मुलगी सुखरूप आहे. 


अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात बिबट्याने मध्यरात्री एका कुटुंबावर हल्ला चढवला. यावेळी धाडसी पत्नीने बिबट्याचा प्रतिकार करत पती आणि मुलीचे प्राण वाचवले. मलंगगड परिसरातील जकात नाका भागात पप्पू बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपले होते. त्याच वेळी अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत प्रवेश केला. बिबट्यानं पप्पू पवार यांच्यावर हल्ला चढवला. या गोंधळाने जागा झालेल्या सखूबाईने लगेचच मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिमतीने प्रतिकार केला... सखूबाईनं धाडसाने बिबट्याला झोपडीतून पिटाळून लावलं. 


या दरम्यान बिबट्याशी झालेल्या झटापटीत तिचा पती पप्पू पवार हा जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याच्या चेहऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र यानंतर अतिशय हिमतीने आपल्या कुटुंबाचं बिबट्यापासून रक्षण करणाऱ्या धाडसी सखुबाईचं कौतुक होतंय.


या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी सुरू केली. पप्पू पवार यांच्या घरी येऊन हल्ला केलेल्या बिबट्याच्या पंज्याचं ठसे कुठे कुठे आहेत? याचा तपास केला. दरम्यान घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेलं आहे. वनविभाग जेव्हा तपास करेल तेव्हा करेल, मात्र मलंगगड परिसरात बिबट्याचा वावर आहे, हे ऐकून नागरिकांना धक्काच बसलाय. कारण ही तसेच आहे, येत्या 5 फेब्रुवारी रोजी मलंगगड यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेत राज्य तसेच राज्याबाहेरून मोठ्याप्रमाणात भाविक येतात, जर वेळेवर बिबट्याला वन विभागाने पकडलं नाही तर याचे परिणाम या मलंगगड यात्रेवर पडणार की काय? अशी भीती स्थानिक नागरिकामध्ये आहे. 


Chandrapur News : वाघाच्या जबड्यातून पत्नीला सोडवलं, जिगरबाज पतीने कुऱ्हाडीने केला वाघाचा सामना
Shaurya Award 2023 : सन्मान शौर्याचा आणि धैर्याचा, असामान्य काम करणाऱ्या वीरांचा एबीपी माझाच्या वतीनं सन्मान
Nashik Igatpuri News : बिबट्यासोबत थरार! वर्षातला शेवटचा दिवस, आयुष्यातला शेवटचा ठरला असता, मात्र...