Nashik Igatpuri News : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुकणे मुंडेगाव शिवहद्दीवरील मुकणे शिवारातील शेतात गवत कापत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट हल्ल्याने परिसरात दहशत पसरली आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यात निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे. आता बिबट्याने पुन्हा इगतपुरी तालुक्यात आपला मोर्चा वळविल्याचे या घटनेवरून दिसून येते. काही दिवसापूर्वीच त्र्यंबक तालुक्यातील वेळुंजे गावानजीक असलेल्या दिवटे वस्तीवरील सह वर्षीय मुलास बिबट्याने लक्ष्य केल्याची घटना घडली होती. आता इगतपुरी तालुक्यातील मुकणे परिसरात भर दिवसा तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून तरुणाने धाडसाने बिबटयाशी दोन हात करत हिम्मत न हारता लढत राहिला. व शेवटी स्थानिक शेतकऱ्याच्या मदतीने बिबट्याला पिटाळून लावण्यात यश आले. मात्र तरुण काही प्रमाणात जखमी झाला आहे. 


इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील प्रकाश अर्जुन बोराडे हा जनावरांसाठी गवत कापायला गेला असता मुकणे-मुंढे गाव शिव हद्दीवरील मुकणे गाय कुरणालगत तो गवत कापत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर पाठीमागून हल्ला चढवला. बराच वेळ झटापट चालू असताना प्रकाशने आरडाओरड केली. प्रकाशाचा आरडाओरडा ऐकून जवळील वीटभट्टीवरील कामगार आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दगडांचा मारा करत शेतकऱ्यांनी बिबट्याला पळून लावले. यामुळे बिबट्याच्या तावडीतून प्रकाश याची सुटका झाली. जखमी अवस्थेत प्रकाशला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. 


बिबट हल्ल्यानंतर मुकणे आणि परिसरातील गावकरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी प्रकाशला उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इगतपुरी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातून करण्यात येत आहे. या भागात अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पाळीव प्राण्यांना बिबट्याने भक्ष बनवले आहे. मात्र वनविभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात पिंजरा लावला जाऊन त्या पिंजऱ्यात काहीही ठेवत नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात जात नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेर बंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.