Ambarnath News : कधी कोणत्या गोष्टींची चोरी होईल याचा अंदाज लावता येणार नाही. मुंबईजवळच्या अंबरनाथ (Ambarnath) शहरात चोरट्यांनी चक्क सार्वजनिक शौचालयांचे (Public Toilet) दरवाजे चोरायला सुरुवात केली आहे. या चोऱ्यांमुळे अंबरनाथ महापालिकाही (Ambarnath Municipal Corporation) हतबल झाली असून परिणामी नागरिकांवर मात्र चक्क छत्री घेऊन शौचालयात (Toilet) जाण्याची वेळ आली आहे.
नागरिकांवर छत्र्या घेऊन शौचालयात जाण्याची वेळ
अंबरनाथ पूर्वेतील अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये दरवाजे नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत स्थानिकांना विचारलं असता महापालिकेने दोन वेळा दरवाजे बसवले, मात्र हे दरवाजे वारंवार कोणीतरी चोरुन नेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र आता दरवाजे नसल्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत असून नागरिकांना चक्क छत्र्या घेऊन शौचालयात जाण्याची वेळ आली आहे.
दरवाजे लवकरात लवकर बसवण्याची मागणी
अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरातील मधली आळी आणि कैलास नगर परिसरातील शौचालयांचे दरवाजे अशाच पद्धतीने चोरीला गेले आहेत. महिला आणि पुरुष अशा दोन्ही शौचालयांमधले दरवाजे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर इथे दरवाजे बसवावेत अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे.
शौचालयासाठी तर वॉचमन ठेवू शकत नाही, नागरिकांची उद्विग्नता
बऱ्याच लोकांच्या घरात शौचालय नसल्यामुळे सकाळच्या वेळी गर्दी असते. त्यांना छत्री घेऊन जावं लागत असल्यामुळे त्यांची कुचंबणा होते. दरवाजा चोरीबाबत मी तीन-चार वेळा तक्रार केली आहे. त्यानंतर महापालिकेने दोन वेळा दरवाजे लावले होते. त्यानंतरही दरवाजांची चोरी होत आहे ही शोकांतिका आहे. त्यामुळे कोणाला दोष द्यायचा हे प्रशासनाने ठरवावं. आता आम्ही टॉयलेटसाठी वॉचमन तर नाही ठेवू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर मार्ग काढायला हवा, असं एका नागरिकाने म्हटलं आहे.
'येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची नजर दरवाजे नसलेल्या शौचालयांवर'
शौचालयाला दरवाजे नसल्यामुळे आमची फार तारांबळ उडते. टॉवेल नाहीतर छत्री घेऊन बसावं लागतं. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची नजर दरवाजे नसलेल्या शौचालयांवर पडते. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर कारवाई करावी, असं आणखी एका नागरिकाने सांगितलं.
दरवाजांच्या अभावी नागरिकांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने दरवाजे लावावेत. तसंच शौचालयांचे दरवाजे चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा
World Toilet Day 2022 : जगातील सर्वात महागडं शौचालय; सोन्याच्या टॉयलेटची किंमत ऐकून हैराण व्हाल