Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची यंदाच्या वर्षी अडचण होणार आहे. कारण यात्रेसाठी लागणारं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्याचे अधिकार एका जिल्ह्यात फक्त एकाच डॉक्टरांना म्हणजे सिव्हिल सर्जनला देण्यात आलेत. यापूर्वी तालुका स्तरावरील सरकारी डॉक्टरसुद्धा हे सर्टिफिकेट देऊ शकत होते. त्यामुळं यात्रेकरूंना हे सर्टिफिकेट सहज मिळत होतं. मात्र यंदा हा नवीन नियम आल्यानं आता प्रत्येक जिल्ह्यात फक्त सिव्हिल सर्जन, म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांनाच हे अधिकार असणार आहेत.
अमरनाथ यात्रा ही सुरक्षेच्या कारणासोबतच शारीरिक दृष्ट्यासुद्धा अतिशय खडतर आणि कसोटीची समजली जाते. त्यामुळेच या यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि मगच यात्रेला जाण्याचं परमिट दिलं जातं. येस बँकेत प्रामुख्यानं ही प्रक्रिया केली जाते. हे परमिट देताना आधी सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून घेतलेला शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला सुद्धा द्यावा लागतो. हा दाखला देण्याचे अधिकार मागच्या वर्षीपर्यंत ग्रामीण रुग्णालय, तालुका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनासुद्धा होते. मात्र यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन म्हणजेच जिल्हा शल्यचिकित्सकांनाच हे अधिकार देण्यात आले आहेत.
येस बँकेबाहेर याबाबतची एक यादी लावण्यात आली असून त्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या डॉक्टरांना दाखले देण्याचे अधिकार आहेत. यासह त्या डॉक्टरांचं नाव, पत्ता, फोन नंबर नमूद करण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातून दरवर्षी शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जात असतात. यावर्षी या सर्व भाविकांना ठाण्याला जाऊन आपलं मेडिकल सर्टिफिकेट आणावं लागेल, तरच या यात्रेकरूंना अमरनाथ यात्रेला जाण्याचं परमिट मिळेल. ही बाब वास्तविक दृष्ट्या अतिशय त्रासदायक असून दुसरीकडे इतक्या यात्रेकरूंची तपासणी करून त्यांना दाखला देणं ही जिल्हा शल्य चिकित्सकांसाठीही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तालुकास्तरावरील सरकारी डॉक्टरांना याबाबतचे अधिकार देण्याची मागणी यात्रेकरूंनी केली आहे.
अमरनाथला यात्रेसाठी असं करा रजिस्ट्रेशन
अमरनाथ यात्रा 1 जुलै 2023 पासून सुरु होईल आणि ही यात्रा 31 ऑगस्टला संपेल. म्हणजेच अमरनाथची यात्रा 62 दिवस चालणार आहे. या यात्रेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करु शकता
अमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांना पूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत. घरापासून ते पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना हवामानाची माहितीही दिली जाईल. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डखाली सकाळी आणि संध्याकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला jksasb.nic.in वर जावे लागेल. याठिकाणी सर्वात आधी अर्ज भरा आणि नंतर तुमचा OTP टाका. या अर्जासह पुढे जा आणि तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती पाठविली जाईल.
यानंतर तुम्हाला पैसे भरावी लागतील. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल परमिट मिळेल, जे तुम्ही डाऊनलोड करु शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ऑफलाईन रजिस्टेशन देखील करु शकता.
13 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्ती अमरनाथ यात्रेला जाऊ शकतात. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही.
जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली तर तुम्हाला 100 ते 220 रुपये खर्च करावे लागतील. हेलिकॉप्टरच्या बुकिंगसाठी 13,000 रुपये मोजावे लागतील.