ठाणे : भिवंडीतील भाषणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरएसएसची बदनामी केल्याचे सांगत त्यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राहुल गांधी यांच्या वकिलांनी भिवंडी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीतून राहुल गांधींना कायमस्वरूपी सूट मिळावी यासाठी दाखल केलेल्या अर्जावर तक्रारदाराचे वकील प्रबोध जयवंत यांनी हरकत घेऊन युक्तिवाद केला. यावर राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडत युक्तिवाद करत न्यायालयात योग्य बाजू मांडल्याने राहुल गांधी यांना या दाव्यातून कायमस्वरूपी सूट देण्याचा निर्णय न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी दिला. त्यामुळे राहुल गांधींना दिलासा मिळाला आहे.
राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधिकारी राजेश कुंटे यांनी कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला. त्या मानहानी बाबतच्या दाव्याची शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे अॅड. प्रबोध जयवंत यांनी बाजू मांडली. तर राहुल गांधी यांची बाजू मांडत अॅड. नारायण अय्यर यांनी जोरदार युक्तिवाद केला.
दरम्यान, तक्रारदाराचे वकील जयवंत यांनी राहुल गांधींना कायमस्वरूपी सूट मिळावी या अर्जाविरुद्ध पर्सिस दाखल करत राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवण्याच्या आदेशामुळे परिस्थितीत बदल झाल्याचा गेल्या सुनावणी वेळी युक्तिवाद केला होता. मात्र राहुल गांधींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांनी अपात्रतेचा आदेश बेकायदेशीर असल्याचा जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्याला योग्य न्यायालयात आव्हान दिले जावे, असे सांगताच यावर तक्रारकर्त्याने उपस्थित केलेल्या वादामुळे नामनिर्देशित विशेष खासदार किंवा आमदार न्यायाधीशांसमोर प्रलंबित असलेल्या मानहानीच्या खटल्यातून कायमस्वरूपी सूट मिळावी या मागणीमुळे आरोपीला हानी पोहोचू शकत नाही, किंवा दुर्लक्ष करू शकत नाही असे भिवंडी जलदगती न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी लक्ष्मीकांत वाडीकर यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते.
आज झालेल्या सुनावणीवेळी राहुल गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर युक्तिवाद झाला. त्यानंतर राहुल गांधींना या दाव्याच्या सुनावणीतून कायमस्वरूपी सूट देण्यात आल्याची माहिती अॅड. नारायण अय्यर यांनी दिली.