ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटूनही अद्याप त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नाही. राज्य सरकारने अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली असून आता अंत्यविधीसाठी फक्त आजचाच दिवस उरला आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचा (akshay shinde) अंत्यविधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. त्यातच, आता उल्हासनगर (ulhasnagar) येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, येथील स्मशानभूमीत पोलिसांकडून खड्डा खोदण्यात आला असून येथे त्याच्या मृतदेहाचे दफन केले जाईल. त्यामुळे, गेल्या 6 दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याचे निश्चित मानले जाते.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं लोकांनी समर्थन केलं. तर, समाजातील काही विचारवंत, वकील आणि राजकीय नेत्यांना हा एन्काऊंटर फेक असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तर, अक्षयच्या वडिलांनी याप्रकरणी न्यायालयात धावदेखील घेतली. त्यामुळे, अक्षयच्या मृतदेहावरील अंत्यंस्कार हादेखील गुंतागुंतीचा विषय बनला. त्यातच, शिंदे कुटुंबीयांच्या रितीरिवाजानुसार अक्षयचा दफनविधी करण्यास सरकारच्यावतीने कबुली दर्शवण्यात आली होती. त्यामुळे, दफनविधीसाठी जागा शोधण्याचं काम पोलिसांकडून गेल्या 3 दिवसांपासून सुरू होतं, अखेर हा शोध संपला आहे.
अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर, अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती. मात्र, अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला. याबाबत स्मशानभूमी बाहेर शिवसेनेने बॅनर सुद्धा लावला आहे. तर दुसरीकडे बदलापूर नगरपालिकेने पोलिसांना काही जागा सुचवल्या असून अजूनही जागेची निश्चिती मात्र झालेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा अंत्यविधी करण्यासाठी आता फक्त आजचा एकच दिवस उरला असून त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला अक्षय शिंदेचा अंत्यविधी करावा लागणार आहे. त्यातच, आता उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कुटुंबासह वकिलांना संरक्षण द्या - कटारनवरे
शिंदे कुटुंबीयांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले, सरकारने अंत्यविधीची जबाबदारी घेतली आहे. मात्र अद्याप दफनविधीसाठी जागा मिळत नाही. जागा मिळवून देणे सरकारचे काम आहे. अंत्यविधी अद्याप झाला नाही. सोमवारी कोर्टात ही बाब मेन्शन करणार आहे. कोर्टात याबाबतची माहिती देणार आहे. आम्ही कुटुंबांसह वकील यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले असून अद्याप कुटुंबासह वकिलांना संरक्षण दिले नसल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे.