मुंबई : स्वप्नातलं घर घेण्यासाठी, आवडीची कार खरेदी करण्यासाठी आपण हमखास एखाद्या बँकेकडून किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतो. कठीण काळात किंवा पैशांची चणचण भासल्यास अनेकदा वैयक्तिक कर्जाचाही पर्याय निवडला जातो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेलं हेच कर्ज कधीकधी तुमच्या पश्चात तुमच्या कुटंबासाठी डोकेदुखी ठरू शकतं. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून तुम्ही एक शक्कल लढवू शकता. या पर्यायाचा अवलंब केल्यास तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला हे कर्ज फेडण्याची गरजही भासणार नाही. हा पर्याय नेमका काय आहे? हे जाणून घेऊ या... 


कुटुंबाची कर्जाच्या हप्त्यापासून सुटका होऊ शकते


तुम्ही आरोग्य विमा, जीवन विमा याप्रमाणेच होम लोनचा, कार लोनचाही विमा काढू शकता. हा विमा तुम्हाला अडचणीच्या काळात मदतीला येऊ शकतो. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास किंवा उत्पान्नाचा स्त्रोत संपल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाची कर्जाच्या हप्त्यापासून सुटका होऊ शकते. बिकट परिस्थितीत तुम्ही या इन्शुरन्सच्या मदतीने तुमचे कर्ज फेडू शकता. 


वय, आरोग्य पाहून ठरतो प्रिमियम


पर्सनल लोन किंवा होम लोनचा इन्शुरन्स घेण्याचे अनेक फायदे आहेत. या इन्शुरन्सचा हप्ता तुम्ही तुमच्या रेग्यूलर हप्त्यासोबत भरू शकता. तुम्ही पर्सनल लोन किंवा होम लोनचा इन्शुरन्स काढल्यास अनुकूल परिस्थितीत बँकेचे कर्ज फेडण्याची गरज नसते. होम लोनचा इन्सुरन्स काढल्यास संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुंटुबाला कर्ज फेडावे लागत नाही. विशेष म्हणजे काही लोन इन्शुरन्स पॉलिसींचा कर वाचवण्यासाठीदेखील उपयोग होतो. तुमचे वय, आरोग्य, कर्ज फेडण्याचा कालावधी लक्षात घेता कर्जाच्या इन्शुसरन्सचा हप्ता ठरवला जातो. कर्जाच्या इन्सुरन्सचा प्रिमियम तुम्ही प्रत्येक महिन्याला भरू शकता. 


लोन इन्शुरन्स काढताना काय काळजी घ्यावी?


लोन इन्शुरन्स घेताना संबंधित कंपनी तुमच्यासमोर अनेक पर्याय ठेवते. म्हणजेच अपघात होणे, नोकरी होणे, मृत्यू होणे अशा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार तुम्हाला संबंधित कंपनी लोन इन्शुरन्स देते. या सर्व बाबींचा विचार करूनच लोन इन्शुरन्स घ्यायला हवे. अशा प्रकारच्या इन्शुरन्समध्ये सर्व प्रकारच्या अपंगत्त्वाचा समावेश असायला हवा. तुम्ही संयुक्तपणे एखादं कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज तुमच्या लोन इन्सुरन्समध्ये कव्हर होईल की नाही, याचीही खात्री करावी. यासह प्रिमियम भरण्यासाठी तुम्हाला कोणते पर्याय दिले जातात याची व्यवस्थित चौकशी करावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोन इन्शुरन्स घेताना इन्शुरन्स देणाऱ्या संबंधित कंपनीच्या अटी आणि शर्तींचा अभ्यास करावा. 


हेही वाचा :


अनिल अंबानी यांची 'ही' कंपनी सुस्साट, दोन आठवड्यांपासून देतेय जबरदस्त रिटर्न्स, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस!