ठाणे : मराठा, ओबीसी समाजानंतर आता आदिवासी समाज बांधव आक्रमक झाले आहेत. धनगर आणि धनगड एकच आहेत याबाबत सरकार लवकरच शासन निर्णय जाहीर करणार आहे,असं सरकारमधील एका मंत्र्यांने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं, असा दावा आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीने केला असून राज्य सरकारने असा शासन निर्णय जारी केला तर त्याला आदिवासी समाज आक्रमकतेने विरोध करेल, अशी भूमिका आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीने घेतली आहे. राज्यात 85 विधानसभा मतदार संघात आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. तर, 25 विधानसभा मतदारसंघ हे आदिवासी समाजाकरता राखीव आहेत. त्यामुळे सरकारने धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर काढावा की नाही याचा विचार करावा असा थेट इशाराच आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे सचिव मधुकर तळपाडे यांनी दिला आहे. 


ठाण्यात एका पत्रकार परीषदेत मधुकर तळपाडे यांनी हा इशारा दिला आहे. धनगर ही जात आहे जमात नाही ते आदिवासींचे निकष पूर्ण करु शकत नसल्याने ते आदिवासी नाहीत त्यामुळे धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्याचा राज्यभर जोरदार विरोध केला जाईल अशी भूमिका आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीने घेतली आहे. 


एकीकडे मराठा समाजाचे आंदोलन, ओबीसी समाजाचे आंदोलन आणि आता आदिवासी समाजाचे आंदोलन यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सरकार हा गुंता कसा सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.याच संबंधी आदिवासी समाजाच्या आमदारांची पुढच्या बुधवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे.


राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन सुरु


महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर विविध समाजघटकांचं आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु असून त्यांनी उपोषण सुरु केलं आहे.तर, ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनगर समाजबांधवांची अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी आहे. तर,  धनगर समाजबांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, असा इशारा आदिवासी समाजाच्या नेत्यांनी घेतली आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रातील विविध आंदोलनांचं केंद्र मराठवाडा बनत असल्याचं पाहायला मिळतं. मनोज जरांगे यांचं आंदोलन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरु आहे. तर, लक्ष्मण हाके यांनी देखील यापूर्वी उपोषण जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी केली होती. 


इतर बातम्या :