Thane News: ठाण्यातील (Thane) एकट्या दिवा (Diva) परिसरात 58 शाळा आहेत त्यापैकी तब्बल 43 शाळा या अनधिकृत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिव्यामध्ये 15 अधिकृत शाळा असल्याची माहिती समोर आली आहे. तर यामधील 43 अनधिकृत शाळांवर ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पण आता या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोर मात्र एक भलं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. या शाळांवर महापालिका शिक्षण विभागाकडून कारवाई तर झाली परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून या शाळांना सील ठोकले पाहिजे अशी मागणी शैक्षणिक सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. महापालिकेने केलेल्या या कारवाईमुळे जवळपास 15 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शैक्षणिक वर्षाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं चित्र आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिवा शहरात 43 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या घटनेनंतर ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाकडून या शाळांना वेळोवेळी नोटीस बजावल्या होत्या. तसेच नियमांचे पालन न केल्याने महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र महापालिकेकडून अनधिकृत शाळांवर झालेली हि कारवाई औपचारिकता आणि दाखवण्यापुरती असल्याचा आरोप ठाणे जिल्हा मर्यादित महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोशियन (मेस्टा) या संस्थेचे अध्यक्ष नरेश पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. 'आजच्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता भाजीपाल्यासारख्या अनधिकृत शाळा सुरु झाल्या आहेत. त्यावर महापालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद विभागाने जातीने लक्ष देऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मेस्टाकडून करण्यात आली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या संबंधित विभागाला अनधिकृत शाळा आणि आरटीई संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण विभागाकडे लेखी पत्रव्यवहार देखील केला आहे. सदर पालिकेकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील मेस्टाकडून करण्यात आली आहे.
'या 43 अनधिकृत शाळा सुरु होईपर्यंत ठाणे महानगर पालिका शिक्षण विभाग झोपले होते का?' असा सवाल भाजप दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला आहे.या शाळांवर तातडीने कारवाई करून या शाळा बंद झाल्या पाहिजेत अशी मागणी देखील शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.