मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असताना दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे आणि विभागवार बैठकांना सुद्धा सुरुवात केली आहे. येत्या 22 जुलैला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांचा मेळाव्याचे आयोजन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. या मेळाव्याला स्वतः उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात हा उत्तर भारतीयांचा मेळावा होणार आहे.
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली
आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. राज्यात सर्व महापालिकांत प्रमाणे विशेष म्हणजे शिंदेच्या ठाण्यातील महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने या निवडणुकीची रणनीती आखत कामाला लागले आहे. त्यात शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे.फेब्रुवारी महिन्यात गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी अशाच प्रकारे उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात हा मेळावा घेण्याचे नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जैन आणि गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती त्यानंतर उत्तर भारतीय मेळाव्याचे मुंबईत आयोजन केले होते.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उत्तर भारतीयांचा मेळावा
आगामी ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टिकोनातून हा ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात विदर्भातून केली होती. त्यांनी भाजपचा आणि फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये सभा देखील घेतली होती. त्यानंतर आता थेट एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात हा उत्तर भारतीयांचा मेळावा होणार आहे.
हिंदी भाषिक मतदारांना वळवण्यासाठी प्रयत्न
मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर पक्ष आतापासूनच तयारीला लागलेत. मुंबई, ठाण्यात सर्वच भाषिक मतदार असल्याने त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यात शिवसनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी योग्य अभ्यास करून प्रांत, भाषा, संस्कृती,मुंबईकरांचे प्रश्न या आदी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कळते.
आगामी काळात महापालिका निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतदारांना वळवण्यासाठी सर्वच पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत हे स्पष्ट आहे.हिंदी भाषिकांची वाढती संख्या, वाढते हिंदी भाषिक नगरसेवक, यातच राजकीय पक्षांच्या वादात होत असलेले मतांचे विभाजन हे आपल्याच पथ्यावर कसे पडेल याचीच चाचपणी उध्दव ठाकरे आणि त्यांचा पक्षा मार्फत आता मेळाव्या निमित्त केली गेलीय असे म्हटले तरी राजकीयदृष्ट्या वावगे ठरणार नाही.