तुमचं व्हॉट्सअॅप सांभाळा, नाशकात हॅकर्सचा धुमाकूळ!
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2017 01:13 PM (IST)
नाशिक: तुम्हाला जर तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून व्हॉट्सअॅपवर अश्लिल मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण आलं तर सावध व्हा. कारण राज्यात व्हॉट्सअॅप हॅकर्सचं रॅकेट कार्यरत असल्याचं नाशिकमध्ये समोर आलं आहे. नाशिकमधील डॉक्टर, मॉडेल, उद्योजक अशा 40 पेक्षा अधिक नेटीझन्सचे व्हॉट्सअॅप हॅक झाले असून सगळ्यांनी सायबर पोलीसांत धाव घेतली आहे. गेल्या 2 दिवसांपासून डॉ. मनिषा रौंदळ यांच्या नावाने त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांना अश्लिल मेसेज, व्हिडीओ क्लिप पाठवल्या जात आहे. मनिषा यांनी आपला मोबाईल, व्हॉट्सअॅप, नेट सगळं बंद करुन ठेवलं तरी हॅकर्सचे उद्योग सुरु आहेत. त्यांच्या नावाने सोशल मीडीयावरुन अश्लिल मेसेज पाठवले जात आहेत. मैत्रीणीच्या नावाखाली हॅकर्सने केलेल्या व्हॉट्सअॅपवरच्या मेसेजला रिप्लाय देणं मनिषा यांना चांगलंच महागात पडलं. बरं ही स्थिती केवळ मनिषा रौंदळ यांचीच आहे असं नाही. डॉक्टर सारीका देवरे यांच्या बाबतीतही तसंच झालं आहे. यांनीही काल सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉक्टर मनिषा, सारीका यांच्याप्रमाणंच नाशिक शहरातले अनेक नामवंत डॉक्टर, मॉडेल, खेळाडू, उद्योजक, विद्यार्थी नेटीझन्स या हॅकर्सच्या उपद्रवांनी हैराण झाले आहेत. अनेकांच्या मोबाईल आणि फ्रेण्डलिस्टमधल्या शेकडो- हजारो नेटीझन्सला अशा पध्दतीचे मेसेज हॅकर्सकडून पाठवले जात आहेत. राज्यभरात हे लोण पोहचलं आहे.