मुंबई: तुम्ही बीडमधे आहात, मुंबई ऑफिसमधून सहकाऱ्याचा फोन येतो, कुठैस बे? बॉस बोलावतोय अर्ध्या तासात मीटिंग आहे. तुम्ही उत्तर द्याल, हे काय आलोच, पोहोचतो 15-20 मिनिटात.


 

भारतात आज नाही, पण येत्या काही दशकात हा संवाद खरा ठरु शकतो. काय विश्वास बसत नाही ना? मात्र, लवकरच हायपरलूप या सुपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हा वायुवेगाचा प्रवास शक्य होणार आहे.

 

पात्र क्रमांक 2- बोल भावा

 

पात्र क्रमांक 1- भावा कुठं हाईस?

 

पात्र क्रमांक 2- भावा कोल्हापुरात

 

पात्र क्रमांक 1- मुंबईला लवकर ये की लेका बॉस बोलवतोय मीटिंग हाय

 

पात्र क्रमांक 2- आलो भावा 20 मिनिटात आलो.

 

हे असलं संभाषण ऐकून तुम्ही नक्कीच चक्रावाल. भले कोल्हापूर ते मुंबई हा 400 किलोमीटरचा प्रवास 20 मिनिटात कसा होणार? पण मंडळी अशाप्रकारचा संवाद येत्या काही दिवसातच होऊ शकणार आहे आणि त्याची चाचणी सुरुही झाली आहे. अमेरिकेतलं नेवाडा इथं नुकतीच याची चाचणी पार पडली

 

काय आहे हायपरलूप सूपरसोनिक तंत्रज्ञान?

 

हायपरलूप या सुपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अवघ्या 1.1 सेकंदात 186 किलोमीटरचा वेग गाठता येणार आहे.

 

या तंत्रज्ञानाने 1 तासात जवळपास 1 हजार किलोमीटरचं अंतर सहजपणे कापता येणार आहे. दोन शहरांमध्ये ट्यूब टाकून त्यातून ही ट्रेन हवेवर तरंगत ट्यूबच्या पोकळीतून प्रवास करणार आहे.

 

या ट्यूबमधून 2019 पर्यंत वायुवेगाने मालवाहतूक आणि 2021 पर्यंत प्रवाशी वाहतूक शक्य होईल असे प्रयत्न सुरु आहेत. ट्यूबमधल्या या ट्रेनवर विपरित हवामानाचा कोणताही परिणाम न होता हा प्रवास करता येणार आहे.

 
दोन शहरांमध्ये अशा प्रकारच्या ट्यूब टाकण्यासाठी किमान 50 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यासोबतच हायपरलूपला वेग पकडण्याआधी अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. मात्र संशोधक हे अडथळे पार करण्यासाठी सज्ज आहेत.

 

मंडळी समजा आपल्या महाराष्ट्रात ही सेवा सुरु झाली तर काय होईल? अहो चांदा ते बांदा तुम्ही काही मिनिटात पोहोचाल.

 

मुंबई–बीड 18 मिनिटे

 

मुंबई-जळगाव 20 मिनिटे

 

मुंबई–कोल्हापूर 17 मिनिटे

 

मुंबई–नागपूर 40 मिनिटे

 

मुंबई –दिल्ली 70 मिनिटे

 

मुंबईकर म्हणा किंवा कुणीही बस किंवा ट्रेनची वाट पाहण्यात जितका वेळ रोजच्यारोज घालवतात तितक्या वेळेत माणसं लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करतील.

 

अर्थात हे स्वप्न परकियांनी पाहिलं, ते सत्यात उतरवण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. आपण मात्र, अजूनही त्यांच्या स्वप्नातल्या बुलेट ट्रेनमध्ये रममाण आहोत. ज्याची चर्चा आता कुठे सुरु झाली आहे.