मुंबई : समाधान ही केवळ मनाची अवस्था असते, असं म्हटलं जातं. सुखी माणसाचा सदरा असेल, तरी गरीबही सुखाची निद्रा घेतो. नाहीतर धनाढ्याला सोन्याच्या पलंगावरही झोप लागत नाही. अशाच गरीब कुटुंबातल्या पाच आनंदी चिमुरड्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.


हातात स्लीपर घेऊन सेल्फीची पोझ देणाऱ्या चिमुरड्यांचा हा फोटो आहे. एकाने हातात स्लीपर कॅमेरासारखी धरल्यानंतर बाकीचे चौघं जण कौतुकभरल्या नजरेने त्याकडे पाहत आहेत आणि जणू सेल्फीची पोझ दिल्यासारखा चेहरा करत आहेत. हा फोटो खरा तर अतिशय सामान्य. मात्र काहीच नसताना ओसंडून वाहणारं समाधान पोरांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

सुख-समाधानाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. लहानपणी आपल्याकडे काही नसताना आपण सुखी असतो, मात्र वय वाढतं तसं भौतिक सुखाच्या हव्यासातून आपण मानसिक स्वास्थ्य गमावत जातो, हे म्हणतात, ते काही चुकीचं नाही.

पाच लहान मुलांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. हा फोटो कधी, कोणी, कुठे काढला, हे अद्याप समजलेलं नाही. मात्र फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अल्पावधीतच या फोटोने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. फोटोला आलेले लाखो लाईक्स आणि शेअर्स याचं द्योतक आहेत.

अगदी बॉलिवूड सेलिब्रेटींनीही या फोटोची दखल घेत कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'आपल्या आनंदाची निवड आपणच करतो' असं ज्येष्ठ अभिनेते बमन इराणी यांना वाटतं. 'आनंद ही केवळ मनाची अवस्था असते' असं अभिनेता सुनील शेट्टी म्हणतो. फोटोग्राफर अतुल कसबेकरनेही हा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मात्र हा फोटो पाहून काहीसे भांबावले आहेत. तंत्रज्ञानाने केल्या जाणाऱ्या चापलुसीमुळे बिग बी काहीशी सावध प्रतिक्रिया देतात 'संपूर्ण आदर आणि माफी मागत म्हणतो... मला वाटतं हा फोटोशॉप्ड आहे. ज्या हातात चप्पल आहे, तो हात शरीराच्या तुलनेने मोठा वाटतो.' असं त्यांनी लिहिलं आहे.

बालपणीचा काळ सुखाचा... असं कोणीतरी म्हणून गेलंय... दुसऱ्या पिढीच्या तुलनेत प्रत्येकाला आपलं बालपण फार ग्रेट वाटतं. याचं कारण म्हणजे आपल्या चांगल्या आठवणी बालपणाशी निगडित असल्यामुळे आपल्याला ते दिवस रम्य वाटतात. पिढी बदलते, तसं 'बालपण'... आणि ते आनंदात घालवण्याच्या व्याख्याही बदलतात. त्यामुळे सुख समाधानाची किल्ली तुमच्याकडे आहेच, गरज आहे फक्त कुलूप उघडण्याची.