मुंबई : PUBG हा मोबाईल गेम खेळण्यासाठी पालकांनी महागडा स्मार्टफोन विकत घेऊन न दिल्याने 18 वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.


'प्लेयर्स अननोन बॅटलग्राऊंड' (PUBG) या ऑनलाईन गेमचं सध्या अनेकांना व्यसन लागलं आहे. मुंबईतल्या कुर्ला भागातील नेहरु नगर येथे राहणाऱ्या एका तरुणानं आपल्या पालकांकडे पबजी खेळण्यासाठी महागडा मोबाईल विकत घेण्याचा हट्ट धरला होता. मुलानं हट्ट धरलेला 37 हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन विकत घेणं पालकांना शक्य नव्हतं. त्यामुळे 20 हजार रुपयांपेक्षा महाग फोन आपण देऊ शकत नाही असं पालकांनी सांगितल्यानंतर निराश झालेल्या तरुणानं घरातच गळफास लावून आत्महत्या केली.

पबजी या ऑनलाईन गेमचं जगभरात अनेकांना वेड लागलेलं आहे. भारतातही अनेक जण हा गेम खेळण्यात तासनतास घालवतात. काही दिवसांपुर्वी या गेमवर बंदी आणण्यासंबंधी अहाद निझाम या 11 वर्षीय मुलानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. "या ऑनलाईन खेळामुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असून हत्या, आक्रमकता, व्यसन या गोष्टी समोर येत आहेत. हा खेळ बंद केला नाही तर मी कायदेशीर प्रक्रिया करणार आहे," असं त्यानं आपल्या पत्रात लिहीलं होतं.

'पब्जी'मुळे मानसिक ताण कमी, पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतर प्लेयर्स खुश

काही दिवसांपुर्वी 'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील ऑनलाइन गेम्सच्या या वेडाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.  तेव्हा त्यांनी 'ये पब्जीवाला लगता है' असं सांगत 'विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वापरु द्या, फक्त त्यांना रोबो होऊ देऊ नका' असा समतोल सल्ला पंतप्रधानांनी दिला होता.