नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान, व्हायरल मेसेजमागील सत्य
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2016 04:45 AM (IST)
मुंबई : फेसबुक, ट्विटर तसंच व्हॉट्सअॅपवर यांसारख्या सोशल मीडियावर कोणती सत्यता न पडताळता चुकीचे मेसेज किंवा बातम्या व्हायरल होतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारा मेसेज. युनेस्कोने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून निवड केली आहे, असा हा मेसेज होता. यानंतर सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल झाला. नेटीझन्सनी व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि फेसबुकवर या मेसेजचा अक्षरश: पाऊस पाडला. मोदींचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये बिलियर्ड आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीचाही समावेश होता. https://twitter.com/PankajAdvani247/status/746284674540929025 मागील आठवड्यात गुरुवारी हा मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हजारो नेटीझन्सनी हा मेसेज फॉरवर्ड केला. मात्र मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी कोणीही त्याची सत्यता तपासून पाहिली नाही. पंकज अडवाणीनेही त्याच्या 2.4 लाख ट्विटर फॉलोअर्ससोबत हा मेसेज शेअर केला. मात्र ही केवळ अफवा असल्याचं शुक्रवारी रात्री समोर आलं. त्यानंतर पंकज अडवाणी यानेही ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिलं. "मला माहित आहे की, माझी माहिती चुकीची ठरली. पण मी जेवढे वर्ल्ड टायटल जिंकले, त्यापेक्षा जास्त लक्ष माझ्या ट्वीटवर देण्यात आलं." https://twitter.com/PankajAdvani247/status/746606284229611520 अडवाणीशिवाय अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आणि हा मेसेज शेअर करण्याचं आवाहन केलं.