नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 5G नेटवर्क संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी वर्चुअल कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून याची माहिती दिली. यापूर्वी सांगण्यात आले होते की कंपनीने 5G चाचण्यांमध्ये 1Gbps स्पीड प्राप्त केलं आहे. कंपनीने यापूर्वी एक निवेदन जारी करत त्यात 5G नेटवर्कशी संबंधित सर्व तयारी पूर्ण केल्याचे सांगितले होते.
अमेरिकेत कंपनीकडून 5G जीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. म्हणजेच सरकारने 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू करताच कंपनीकडून 5G सेवा सुरू केली जाईल. सप्टेंबरमध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी सूत्रांनी सांगितले होते की गेल्या एजीएममध्ये स्मार्टफोन जिओ-गूगल 5G ची घोषणा आज करण्यात येईल. प्राप्त माहितीनुसार या फोनची किंमत 3500 ते 5000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून स्वस्त 5 जी फोनची घोषणा देखील करण्यात आली आहे. देशात अद्याप 5G सेवा सुरू करण्यात आली नाही. सध्या बाजारात उपलब्ध 5 जी फोनची किंमत 16,000 रुपयांच्या वर आहे.
आजच्या एजीएममध्ये रिलायन्सकडून कमी किमतीची लॅपटॉपसुद्धा सादर केला जाण्याची शक्यता आहे. या लॅपटॉपचे नाव जिओबुक ठेवले जाईल. हा लॅपटॉप यंदा लॉन्च केला जाऊ शकतो. 5 जी स्मार्टफोनवर बर्याच दिवसांपासून काम चालू आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी जिओमध्ये गुगलकडून 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनला
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये इतका आहे.