नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 44 व्या वार्षिक बैठकीत मोठी घोषणा केली आहे. गुगल आणि जिओ टीमने 'जिओ फोन नेक्स्ट' हा नवा फोन विकसित केला आहे. ते म्हणाले की गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल.
भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अॅप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे.
Reliance AGM 2021 Announcement: आम्ही 5G नेटवर्क सुरू करण्यास सज्ज, रिलायन्स जिओकडून मोठी घोषणा
गेल्या वर्षी रिलायन्स जिओने गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई नवीन स्मार्टफोनविषयी म्हणाले, “आमचं पुढचं पाऊल गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणार्या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होत आहे. हा फोन भारतासाठी तयार करण्यात आला असून त्या लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी आहे, जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील. गूगल क्लाऊड आणि जिओ दरम्यान नवीन 5 जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटला जोडण्याला मदत करेल. सोबत भारताला डिजिटल करण्याची ही पायाभरणी असेल.
यापूर्वी सूत्रांनी सांगितले होते की गेल्या एजीएममध्ये स्मार्टफोन जिओ-गूगल 5G ची घोषणा आज करण्यात येईल. प्राप्त माहितीनुसार या फोनची किंमत 3500 ते 5000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून स्वस्त 5 जी फोनची घोषणा देखील करण्यात आली आहे. देशात अद्याप 5G सेवा सुरू करण्यात आली नाही. सध्या बाजारात उपलब्ध 5 जी फोनची किंमत 16,000 रुपयांच्या वर आहे.
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनला
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये इतका आहे.