नाशिक/मुंबईः अमेरिकेत कार्यरत असलेल्या आणि मूळच्या नाशिकच्या प्रा. डॉ. रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 3 कोटी 35 लाख रुपये, अशी पारितोषकाची रक्कम असते. डॉ. रमेश रासकर यांच्या संशोधनाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.

प्राध्यापक डॉ. रमेश रासकर हे भारतीय नाव सध्या जगाच्या चर्चेचा विषय बनलं आहे. मूळच्या नाशिकच्या आणि सध्या अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापक असलेल्या या माणसाने असे काही शोध लावलेत, जे थक्क करुन सोडतात.

असं आहे डॉ. रमेश रासकरांचं संशोधन

  • फेम्टो फोटोग्राफीद्वारे प्रकाशाचा वेग टिपणे शक्य होणार.

  • स्मार्टफोनद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर शोधणं शक्य.

  • कमी खर्चात डोळ्याची काळजी घेणारं उपकरण उपलब्ध होणार.

  • न उघडता पुस्तकातील मजकूर वाचणं शक्य होणार.

  • एक्स रे शिवाय शरीरातील निरीक्षण करणं जमणार आहे.

  • लेझरद्वारे अडथळ्यांपलिकडच्या वस्तूही टिपता येतील.

  • दाट धुक्यातूनही गाडी सहजगत्या चालवण्याचं तंत्र विकसित होणार.


 



माणसाचं जीवन अजूनच सोपं करणारे प्रयोग

पुस्तक न उघडता त्यातील मजकूर वाचणं, पुस्तकातील पानापानावर असलेले शब्द नेमके शोधणं आणि ते परावर्तीत करुन मूळ रुपात दाखवणं नक्कीच सोपं नव्हतं, पण ते डॉ.. रासकरांनी शक्य करुन दाखवलं आहे.

अमेरिकेत संशोधन सुरु असलं तरी डॉ. रासकरांची नाळ इथल्या मातीशी घट्ट बांधलेली आहे. देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या अशा संशोधकाचं प्रत्येक भारतीयाला कौतुक आहे.

सायफाय सिनेमातील अनेक प्रयोग सत्यात उतरल्याची उदाहरणं आहेत. तसंच माणसाचं आयुष्य आणखी सोपं व्हावं, यासाठी झटणाऱ्या संशोधकांमध्ये रमेश रासकरांचं नावही अग्रक्रमाने घेतलं जाईल.